कार्यकर्त्याला थांब म्हटलं, मारहाण केली नाही, बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण
मी त्या कार्यकर्त्यांना मारलं नाही. पण तो व्हिडीओ तोडमोड करून विरोधकांकडून व्हायरल केल्या गेला.
स्वप्निल उमप, Tv9 मराठी प्रतिनिधी, अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा काल सकाळी व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत त्यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. चांदुरबाजारात गणोजा देवी या गावात बच्चू कडू रस्ता भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यकर्ता आणि एक व्यक्ती यामध्ये बाचाबाची सुरू होती. कार्यकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तो कार्यकर्त्याला समजावतानाचा व्हिडीओ आहे. परंतु, विरोधकांनी त्या व्हिडीओवरून विरोधकांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं.
मला फक्त थांब म्हटलं
त्यावेळी काहीच घडलं नाही. नेत्यापासून कार्यकर्ता कसा दूर व्हावा, हा विरोधकांचा प्रयत्न म्हणून त्यांनी व्हिडिओ व्हायरलं केला. मला फक्त थांब म्हटलं. समोरचा व्यक्ती ऐकत नव्हता, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यानं दिली. मला कानशिलात लावलीच नाही, असं स्पष्टीकरण संबंधित कार्यकर्त्यानं दिलं.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न
आमदार बच्चू कडू म्हणतात, मी त्या कार्यकर्त्यांना मारलं नाही. पण तो व्हिडीओ तोडमोड करून विरोधकांकडून व्हायरल केल्या गेला. बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी त्या कार्यकर्त्याला फक्त थांब म्हटलं. याला मारहाण म्हणत नाही. थांब म्हणणं आणि मारहाण करणं यात फरक असतो. आमचं कार्यकर्त्यांसोबत कौटुंबीक नातं आहे.
अचलपूर, चांदुरबाजार मतदारसंघातील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी पाच कोटी रुपये आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नानं मंजूर झाले. त्या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी काल बच्चू कडू ग्रामीण भागात गेले होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यातील हा व्हिडीओ आहे. कार्यकर्त्यासोंबत बोलणं सुरू होतं, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.