Amravati Weather : उर्ध्व वर्धा धरणातून पाणी सोडणार, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, अमरावती जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना गोठ्यामध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी.
अमरावती : गेल्या पाच-सहा दिवसांच्या पावसाचा जोर पाहता उर्ध्व वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. शिवाय वर्धा नदीच्या धरणाखालील भागातील नदीनाल्यांचा विसर्ग नदीपात्रात राहणार आहे. त्यामुळं नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोर्शी उर्ध्व वर्धा धरण उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना कळविलं आहे. अमरावती जिल्हाला 14 जुलैला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर करण्यात आले आहे. 17 जुलैपर्यंत अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. वरुड, मोर्शी, चिखलदरा, चांदुरबाजार, चांदुररेल्वे या तालुक्यांत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. असा हवामान खात्याचा अंदाज असल्याचं दुर्गापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे (Center for Agricultural Sciences) डॉ. सचिन मुंढे (Dr. Sachin Mundhe) यांनी सांगितलंय.
पाहा व्हिडीओ
अमरावती जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?
हे सुद्धा वाचाडॉ. सचिन मुंढे, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, जि. अमरावती pic.twitter.com/pMXVQYpg7Q
— Govind Hatwar (@GovindHatwar) July 13, 2022
14 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर
अमरावती जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही ३० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नदी, नाल्याच्या ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदी, नाल्यांच्या काठवर जाऊ नये. अमरावती जिल्ह्यात पुढील पाच दिवस 21 ते 26अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. वाऱ्याचा ताशी वेग पाच किमी तास राहील. 14 ते 17 जुलैदरम्यान आकाश ढगाळलेलं राहील. अमरावती जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह तसेच मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात 14 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. 16 व 17 जुलैलाही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
काय काळजी घ्याल
शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना गोठ्यामध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी. शक्यतो जनावरे मोकळ्या चराई क्षेत्रावर चारणे टाळावे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकामध्ये पाणी साचून राहणार याची दक्षता घ्यावी. शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासल्यास खोदलेल्या चरांद्वारे अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. भाजीपाला आणि फळबाग पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. नदी, नाल्यांजवळ जाऊ नये. हवामानाच्या अंदाजासाठी मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. मेघगर्जना व विजेचा पुर्वानुमानाकरिता दामिनी अॅपचा वापर करावा.
शेतीविषयक मार्गदर्शनासाठी येथे साधा संपर्क
हवामान विषयक माहितीसाठी कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. सचिन मुंढे यांच्या 7620877237 आणि 9960196250 या हे व्हाट्सअप नंबर शेतकरी समूहात हवामान विषयक माहितीकरिता समाविष्ट करावेत. दुर्गापुरातील कृषी विज्ञान केंद्रात माती व पाणी परीक्षण, जैविक औषधी व खते, अन्न परीक्षण प्रयोगशाळा, अन्न प्रक्रिया माहिती, रोपवाटिका, बियाणे चाचणी प्रमाणित व पायाभूत बियाणे उपलब्धता आहे. शेतकरी मार्गदर्शन केंद्रासाठी संपर्क :- 0721-2992244, 9637717818, 8308010038, 9921332611, 7620877237 येथे करावा.