धरण उशाला आणि कोरड घशाला… भर पावसाळ्यात नाशिककरांना प्यायला पाणी नाही…
पालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणीपुरवठा विभागावर ताशेरे ओढले. पालिकेत प्रशासक आल्यापासूनच ही परिस्थिति उद्भवली असाही आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. यावेळी पालिका प्रशासनाला मोर्चेकऱ्यांनी निवेदन देत पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी आग्रही मागणी केली आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण याच नाशिक शहरातील पाणी (Water) मिळत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे. विशेष म्हणजे ज्या धरणांतून शहराला पाणीपुरवठा होतो ते धरण काठोकाठ भरलेले आहे. नाशिक शहरातील नागरिक हे शहरातील पाणीबाणीला वैतागले असून त्यांनी थेट नाशिक महानगर (NMC) पालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडा मोर्चा काढत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पालिकेवर प्रशासक येण्यापूर्वी भाजपच्या सत्तेत सभागृह नेता म्हणून ज्यांनी काम पाहिले त्यांनीच या मोर्चाचे नेतृत्व केलं होतं. त्यामुळे पालिकेवर निघालेल्या हंडा मोर्चाची पालिका वर्तुळात मोठी चर्चा आहे.
यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणीपुरवठा विभागावर ताशेरे ओढले. पालिकेत प्रशासक आल्यापासूनच ही परिस्थिति उद्भवली असाही आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. यावेळी पालिका प्रशासनाला मोर्चेकऱ्यांनी निवेदन देत पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी आग्रही मागणी केली आहे.
निवेदनामध्ये, पालिका आयुक्त तथा प्रशासक यांचा उल्लेख करत नाशिक महानगरपालिकेत प्रशासक लागल्यापासुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे . गेली २० वर्षात कधीही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही ती प्रशासक लागल्यापासुन समस्या निर्माण झालेली आहे . सद्या सर्वत्र पाऊस मोठया प्रमाणात पडत असल्याने गंगापुर धरणातुन तसेच इतर धरणांतुन पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे.
आमच्या पुर्वीचा प्रभाग क ९ च्या उशाला गंगापुर धरण आहे व जलशुध्दीकरण केंद्र आहे . तरी आमच्या प्रभागात पिण्यासाठी पाणी नाही हेच चित्र संपुर्ण नाशिक शहरात आहे. प्रभागात पाणी कमी वेळ येते व तेही कमी दाबाने येते . वॉलमनला विचारले तर तो सांगतो टाकीतुन जेवढे पाणी सोडले जाते तेवढेच मी सोडतो. आधिकाऱ्यांना विचारले तर ते वेगळीच उत्तरे देतात. एकंदरीत सर्व सावळा गोधंळ सुरू आहे.
पावसाळा असतांनाही आधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अधिकाऱ्यांना अनेक वेळा कळवुनही काहीही कार्यवाही होत नाही. धरणात मुबलक पाणी साठा असतांना वॉलमन काम करत नाही . जलकुंभावर काम करणारे कर्मचारी काम करत नाही. अधिक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, कनिष्ठ अभियंता असतील हे लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांचे कामावर नियंत्रण नाही .
वॉलमन व कर्मचारी काम करत नाहीत म्हणुन ही समस्या निर्माण झालेली आहे. तरी दोन दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढु व जनआंदोलन करू आणि यात होणाऱ्या परिणामास सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे आव्हान यावेळी निवेदनात करण्यात आले आहे.