‘ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट अन् म्हणून…’, अनिल देशमुखांचा पुन्हा महायुतीवर हल्लाबोल
अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधासभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून त्यांचा विजय सुद्धा डुप्लिकेट झाला आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधासभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून त्यांचा विजय सुद्धा डुप्लिकेट झाला आहे. एक बाहुल गेलं आणि दुसरं बाहुल आलं अशी परिस्थिती सध्या इलेक्शन कमिशनची आहे. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे आश्वासनं दिले होते. आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं भाजपने सांगितलं होतं. पण आता चार महिने झाले आहेत, शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी तुम्ही वीस हजार कोटी रुपये खर्च करू शकत नाहीत? असा हल्लोबोल यावेळी अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, सरकार लाडक्या बहिणींचे पैसे 2100 रुपये करणार होते, ते 2100 तर केलेच नाहीत, मात्र या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. तूम्ही जर गुंडांना संरक्षण द्याल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था कशी राहील? लोकांचे जे प्रश्न आहेत, त्यांना वाच्या फोडण्यासाठी आम्ही जनतेपुढे जात आहोत, आणि संपूर्ण राज्यात हा दौरा सुरू राहणार आहे.
विश्व हिंदू परिषदेने ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राज्य शासनाने जर पुढाकार घेतला नाही तर आम्ही कारसेवक जाऊन औरंगजेबाची ती कबर उखडून काढू. हे वक्तव्य दुर्दैवी आहे. हे असे प्रश्न उकरून काढून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने याची दखल घेतली पाहिजे.
महाराष्ट्रातील जनता या प्रशासक राजला आता कंटाळली आहे, त्यामुळे राज्य शासनाने महानगरपालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. सरकार कायद्याची बाजू मांडण्यात कमी पडते का? हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे. असा हल्लाबोल यावेळी अनिल देशमुख यांनी सरकारवर केला आहे.