Anil Parab : पालकमंत्री अनिल परबांना हटवा, रत्नागिरी शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी, एनसीपीला कामं देत असल्याचा आरोप
आता रत्नागिरीचे पालकमंत्री हटवा, अशी मागणी शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी केल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. येत्याा काही दिवसांतच शिवसेनेचे राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यासाठी चिपळूणमध्ये आज शिवसेनेची बैठक पार पडली आहे.
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतली (Shivsena) अंतर्गत नाराजी बाहेर आल्याने राजकारणात खळबळ माजली होती. कारण रामदास कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनींच अनिल परब (Ramdas kadam) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवत अनेक गंभीर आरोप केले होते. अनिल परब शिवसेना संपवत आहे, असेही यावेळी रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर आता रत्नागिरीचे (Ratnagiri) पालकमंत्री हटवा, अशी मागणी शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी केल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. येत्याा काही दिवसांतच शिवसेनेचे राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यासाठी चिपळूणमध्ये आज शिवसेनेची बैठक पार पडली आहे. मात्र या रत्नगिरीमधील या बैठकीत पाच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकादा अंतर्गत संघर्षाने कोकणातलं राजकारण ढवळून निघताना दिसून येत आहे.
राष्ट्रवादीला कामं देतात
रत्नागिरीत शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पाच तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत शिवसेनकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अनिल परब राष्ट्रवादी काँग्रेसला कामं देतात आणि शिवसेनेच्या लोकांना डावलतात, असाही आरोप या बैठकीत करण्यात आलाय. तसेच पक्ष निरीक्षक सुधीर मोरे आणि शरद बोरकर यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहितीही समोर आली आहे. 4 तास पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्याबद्दलच्या नाराजीचा सूर आज शिवसेनेत दिसून आला. त्यामुळे शिवसेनेचे वरीष्ठ नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नाराजीची कशी दखल घेतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
फक्त झेंडावंदनला येतात
पालकमंत्री फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळा ते जिल्ह्यात दिसत नाहीत. असे म्हणत चिपळूण ,गुहागर,खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतापले होते. तर बैठक ही चिपळूणमधील पुष्कर हॉल मध्ये पार पडल्याची माहिती समोर आली आहे. आक्रमक पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नासमोर पक्ष निरीक्षक निरुत्तर झाल्याचेही सांगण्यात आले आहे. अनिल परब यांच्याविषयी अशी उघड नाराजी बाहेर येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
रामदास कदमांचे आरोप काय होते?
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पत्रकार परिषदेतही काही गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे शिवसेनेच्या विरोधकांना मदत करून शिवसेनेला कमजोर करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि शिवसेना वाचवावी अशी याचना त्यांनी केली होती. तसेच आपण शिवसेना शेवटपर्यंत सोडणार नाही. मात्र माझ्या मुलांनी त्यांच्या भविष्यासाठी काही वेगळा निर्णय घेतला तर काही सांगू शकत नाही असेही ते म्हणाले होते. त्यानंतर अनिल परबांविषयी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उभा राहिले होते. मात्र तेव्हाही परबांनी या आरोपांना उत्तर देण्याचे टाळले होते. आता पुन्हा पदाधिकाऱ्यांची अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याने आता परब ही परिस्थिती कशी हाताळणार हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे.