‘महायुतीमध्ये अजित पवार गटाला भवितव्य नाही’, अनिल थत्ते यांचं नेमकं भाकीत काय?
"त्यांना प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद द्यायचे होते. सुनील तटकरे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देत होते. मात्र त्यांनी घेतले नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात आपत्ती ओढून घेतली आहे. मला असे वाटते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे", असा दावा अनिल थत्ते यांनी केला.
राजकीय घडामोडींचे विश्लेषक, भविष्कार तथा पत्रकार अनिल थत्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिलीय. मोदींच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळालेली नाही. भाजपकडून अजित पवार गटाला एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. पण अजित पवार गटाची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती. त्यामुळे त्यांनी भाजपची सध्याची ऑफर नाकारली. या राजकीय घडामोडींवर अनिल थत्ते यांनी प्रतिक्रिया दिली.
“त्यांना प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद द्यायचे होते. सुनील तटकरे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देत होते. मात्र त्यांनी घेतले नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात आपत्ती ओढून घेतली आहे. मला असे वाटते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गटाला भवितव्य नाही. मान ना मान मैं तेरा मेहमान म्हणून चिटकून उभे आहेत. उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही”, असं अनिल थत्ते म्हणाले.
मुरलीधर मोहोळ यांच्या राज्यमंत्रीपदावर अनिल थत्ते म्हणाले…
पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यावरही अनिल थत्ते यांनी प्रतिक्रिया दिली. “एखाद्याला शह देण्यासाठी दुसरा उभा करायचा हा इरादा पूर्ण होईल, असा टक्करबाज समोर उभा केला आहे. पुण्यातून अजित दादांचं खच्चीकरण करणे हा त्यामागचा हेतू आहे, तो नक्कीच असू शकतो”, अशी प्रतिक्रिया थत्ते यांनी दिली.
‘हे घवघवीत यश नाही, मार्जिन यश’
नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावरही थत्ते यांनी प्रतिक्रिया दिली. “हे घवघवीत यश नाही. मार्जिन यश आहे. हा सोहळ्याचा क्षण नसून आत्मपरिक्षणाचा क्षण आहे. टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि जेडीयू प्रमुख नितेश कुमार यांना हाताशी धरून बाजूला ठेवतील”, असा दावा अनिल थत्ते यांनी केला.