“रोज 700-800 फोन, अश्लील कमेंट…” अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी, पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप
आता याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे आणि डॉ. संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच आता याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मला बीडमधून अनेक धमकीचे फोन येत आहेत. कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
“मला सातशे ते आठशे लोकांचे फोन कॉल आले”
“धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून मला अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे नावाचा व्यक्ती मला फोन करत आहे. नरेंद्र सांगळे ही व्यक्ती शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत आहे. गेल्या चार दिवसांपासून मला सातशे ते आठशे लोकांचे फोन कॉल येऊन गेले. दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधानं केली होती. बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत, असं मला अभ्यासातून समजलं होतं”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
“मी कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नाही”
“दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधानं केली होती. बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत, असं मला अभ्यासातून समजलं होतं. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आलं होतं. काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये बलावण्यात आलं. हे विधान कुठेही समाजाविरोधात बोलले नव्हते. मुद्दा हा आहे की मी कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नाही, तर मी जर आता बोलले तर ते का बोलले?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक
“नरेंद्र सांगळे यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता. हा माणूस उठसूठ फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोननंबर फेसबूकवर टाकलाय. तसंच, काही पोस्ट केल्या आहेत. त्यांनी खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर ते समर्थक असल्याचं दिसतंय. माझ्याविरोधात त्यांनी अश्लील कॉमेंट्स करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले. आज चौथा दिवस आहे. मी मॉरिशअसला स्कुबा डायविंगला गेले होते. त्यातील एक फोटो फेसबूकवर टाकून अश्लील कमेंट्स केली. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत”, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.