‘होय, मी नाराज आहे…’ शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने टाकला बॉम्ब; काय केली शंका व्यक्त?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेतील काही नेते अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. आता आणखी एका नेत्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलं होतं. नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांसोबतच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 19 शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छूक होते, आपल्याला यावेळी मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती.
मात्र मंत्रिमंडळ विस्तारात ज्या नेत्यांचा पत्ता कट झाला, त्यांच्याकडून आता जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही नेते नाराज आहेत. ज्यामध्ये प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावकर अशा काही शिवसेना नेत्यांचा समावेश आहे. राजेंद्र यड्रावकर यांनी तर जाहीरपणे आपली नाराजी उघड केली आहे.
नेमकं काय म्हणाले राजेंद्र यड्रावकर?
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी मी माझं राज्यमंत्रिपद सोडून त्यांच्यासोबत गेलो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या विद्यमान मंत्र्यांना मी वगळता सर्वांना मंत्रिपद मिळालं. त्यामुळे किमान यावेळी तर मला मंत्रिपद मिळेल अशी माझी अपेक्षा होती. मात्र मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे माझी निराशा झाली, मी नाराज झालो आहे. मला वाटतं मंत्रिपद न देण्यामागे नेत्यांच्या काही अडचणी असाव्यात, किंवा छोट्या मित्र पक्षांना मंत्रिपद देणं गरजेचं वाटलं नसावं, असं यड्रावकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अडीच वर्षांनी शिवसेना नव्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर देखील यड्रावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रिपदं बदलली जातील याबद्दल शंका आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षाबाबत मला माहिती नाही, मात्र मी आशावादी आहे. ज्यांच्या सोबत जातो तिथे प्रामाणिक राहतो ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाल नसल्यामुळे मी नाराज असलो तरी पाच वर्षे महायुती सोबतच राहणार, असं त्यांनी यावेळी म्हटलं.