सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून एकनाथ शिंदे मु्ख्यमंत्री पदावर विराजमान झाले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदा हल्लाबोल चालू असतानाच सिंधुदु्र्ग जिल्ह्यातील नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात सावंतवाडीमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन वेगळे यासाठी ठरलेलं आहे की, आज 1 एप्रिल असल्याने एप्रिल फुल ढोल बजाओ आंदोलन जोरदारपणे करण्यात आले आहे.
आमदार दीपक केसरकर मंत्री झाल्यापासून कोकणच्या विकासासाठी ते फक्त घोषणाच करत सुटले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे.
आज 1 एप्रिल असल्याने त्यांच्याविरोधात एप्रिल फुल आंदोलन ढोल बजाओ आंदोलन छेडण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे सावंतवाडीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात आले.
मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावतीने सावंतवाडी बस स्थानक आवारात एप्रिल फुल ढोल बजाओ आंदोलन कारण्यात आले.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विकास कामे प्रलंबित असून मंत्री केसरकर हे फक्त घोषणाबाजी करत आहेत.
मात्र प्रत्यक्षात कोणतीही विकास कामं पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे केसरकर यांना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हे एप्रिल फूल ढोल बजाओ आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
सांवतवाडी विधानसभा मतदार संघातील विकास कामं जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आज केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता.