गजाभाऊ, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसू नका; रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात जुंपली
भावी मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांचे बॅनर्स लागले होते. त्याबाबत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा असो, नाना पटोले असो की बाळासाहेब थोरात असो, ज्यांचा वाढदिवस असतो ते सगळे मुख्यमंत्री होत असतात. कार्यकर्ते प्रेमापोटी बॅनर्स लावत असतात, त्याला पर्याय नाही, असं रामदास कदम यांनी सांगितलं.
गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर आणि शिवसेनेचेच दुसरे नेते रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कीर्तिकर लढणार नसतील तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची जागा माझ्या मुलाला सोडावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. त्याला गजानन कीर्तिकर यांनी कडाडून विरोध केला होता. आपण लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर तुम्ही लढा. पण दुटप्पीपणा करू नका, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा पलटवार रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. गजाभाऊ तुम्ही निवडणुकीला जरूर उभे राहा. तुमचा मुलगाही तुमच्या मतदारसंघात उभा राहणार आहे. त्यामुळे उभं राहिल्यानंतर लढा. फक्त फॉर्म भरून घरात बसू नका. पक्षाची बेईमानी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं काही कारण नाही. तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहात. एकाच ऑफिसमध्ये बाप आणि बेटा बसतात. एकाच ऑफिसमध्ये बसून दोघे काय करतात हे सगळी दुनिया बघतेय. मुलाला तिकडून उभं करायचं. तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आणि मुलाला बिनविरोध निवडून आणायचं असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्या. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका एवढीच तुम्हाला हातजोडून विनंती आहे, असं रामदास कदम म्हणाले.
तेव्हा लाज नाही वाटली का?
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. ज्या उद्धव ठाकरेंकडे स्वतः नैतिकता नाही, ते नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत. स्वतः मुख्यमंत्री बनले. माझ्या आणि एका ज्येष्ठ नेत्याची खाती काढून आपल्या मुलाला दिली. ही खाती दिली तेव्हा लाज नाही वाटली का? असा संतप्त सवाल कदम यांनी केला.
लाज वाटली पाहिजे
कॅबिनेटमध्ये गँगवार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही रामदास कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅबिनेटमध्ये दोन मंत्री आमनेसामने आले असतील तर तसे सिद्ध करून दाखवा, असं बोलताना संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
खुशाल प्रमाणपत्र घ्या
कोकणात फार कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोकणामध्ये फक्त 69 नोंदणी सापडल्या आहेत. अहमदनगरला 55 हजार नोंदी सापडल्यात आणि कोकणामध्ये फक्त 69 नोंदणी सापडल्या आहेत. हा जमीन अस्मानचा फरक आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यावे. माझी काही हरकत नाही, असं ते म्हणाले.
जातिनिहाय जनगणाना करा
जनगणनेला मी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने जातिनिहाय गणना केली पाहिजे. मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. भविष्यामध्ये मराठा समाजाला टिकेल असे 50 टक्क्याच्यावर आरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षण दिला पाहिजे, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. जरांगे यांनी हा चांगला विषय घेतला आहे. त्यामुळे लाखो मुलांना प्रमाणपत्र मिळतील, असंही ते म्हणाले.