जाणिवा जीवंत असणारे रिअल हिरो, पूरग्रस्तांना मदतीचा हात
पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही उतरले आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र हा तेथील समृद्ध शेती आणि उद्योगांसाठी देशभरात ओळखला जातो. मात्र, आज याच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि इतर भागात महापुराने थैमान घातले आहे. या पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही उतरले आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील या कलाकारांपैकी काहींनी ठाण्यात 10 ते 14 ऑगस्टदरम्यान सिनेरसिकांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या मदत जमा करण्याच्या कामाविषयी बोलताना ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकार कुशल बद्रिके म्हणाला, “आम्ही कोणतीही चळवळ करत नसून आमची ही कृती म्हणजे जाणिवा जीवंत असलेल्या माणसांनी अडचणीत असलेल्या माणसांसाठी टाकलेलं एक पाऊल आहे. आता अशी हजारो पाऊलं एकत्र येत आहेत.” यासह रवी जाधव यांनी देखील हे संकट मोठं असल्याचं म्हणत शक्य ती मदत करण्याचे आवाहन केलं.
‘राणादासह तुझ्यात जीव रंगलाच्या टीमलाही पुराचा फटका’
महापुराने कोल्हापूरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. याचा फटका ‘तुझ्यात जीव रंगला’ या प्रसिद्ध मालिकेच्या स्टाफलाही बसला आहे. या मालिकेचे मागील 3 वर्षांपासून कोल्हापूरमध्येच चित्रीकरण सुरु आहे. हार्दिक जोशीसह (राणादा) सर्व मालिकेचा स्टाफ कोल्हापूर येथेच आहे. त्यांना देखील पुराचा फटका बसला. त्यांनी पुरातून बचाव करत इतर पुरग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे.
हार्दिक जोशी म्हणाला, “पहिल्याच दिवशी कलाकारांच्या टीममधील काही महिला सहकारी पाण्यात अडकले होते. त्यावेळी आम्ही त्यांना मदत करत बाहेर काढले. तसेच इतर नागरिकांनाही तेथून बाहेर पडण्याचे आवाहन केलं. तेथील सर्वांना घेऊन आम्ही स्थलांतर केलं. पुढील दिवशी आमचं जेथे शुटिंग सुरु होतं तेथे गेलो. त्या गावात देखील 700 ते 800 लोकांना स्थलांतरित केलं. त्यांना मंदिर आणि इतर उपलब्ध सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यांच्या जेवणाची आणि इतर राहण्याची सोय आमची प्रोडक्शन टीम करत आहे.”
कसबा बावड्यात देखील अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. तेथे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या आपत्तीनंतर येथील लोकांना मदतीची गरज लागणार आहे. पुरानंतर जी रोगराई पसरेल त्यापासून नागरिकांना बचाव करता यावा म्हणून आम्ही या भागात वैद्यकीय शिबीरं आयोजित करणार आहोत, असं हार्दिक जोशीने सांगितलं. ‘मराठी संस्कृती एकमेकांना नेहमी मदत करण्याची शिकवण देते’
हार्दिक जोशी म्हणाला, “आम्ही कलाकार केवळ त्या मालिकेसाठीच काम करत नाही. आपण एक कुटुंब आहोत त्यामुळे कुणाला काहीही मदत लागली तर आम्हाला सांगा असं आव्हान आम्ही आजूबाजूच्या नागरिकांना केलं आहे. आपली मराठी संस्कृती एकमेकांना नेहमी मदत करण्याची शिकवण देते. माणूसकी जपण्यास सांगते. आपुलकीने चौकशी केली आणि शक्य होईल ती मदत केली तर लोकांना आनंद होतो. आम्ही हे काम आमचे कर्तव्य म्हणून करतो आहे.”