नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यामध्ये काही राज्यांनी कायदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई येथील काही प्रकरणे समोर आल्याने त्यावरून राजकीय पक्षांमधील वातावरण देखील तापले आहे. त्यावरून ठिकठिकाणी मोर्चे देखील निघाले आहे. त्यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलं आहे. यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवरच निशाणा साधला आहे. भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा कायदा बनवलेला आहे. आणि हा बनविलेला कायदा बेकायदेशीर आहे. लव्ह जिहाद म्हणतात पण भाजपमध्ये असे किती लोकं आहेत की त्यांनी असे लग्न केले आहेत असा सवालही असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित करत केंद्रासह राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि ईतर खूप मुद्दे आहेत, कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय ? प्रत्येक प्रश्नाला जातीयवाद करताय, लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार ? धर्मपरिवर्तन बाबत जुना कायदा आहेच, ज्यांना जे आवडतंय ते करूद्या असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हंटले आहे.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत, औरंगाबाद नंतर ते नाशिकमध्ये आले होते, नाशिकमध्ये असदुद्दीन ओवैसी हे मुक्कामी होते.
यावेळी माध्यमांशी बोलत असतांना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल करत लव्ह जिहादच्या संदर्भात जे कायदे केले ते बेकायदेशीर असल्याचे म्हंटले आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी कुणी प्रेम करत असेल तर करू द्या संविधानाने दिलेला तो अधिकार आहे असे सांगत भाजपच्या किती लोकांनी असे लग्न केले आहे म्हणून सवाल विचारला आहे.
महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या विरोधात जे मोर्चे निघत आहे त्यावरही असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्येक प्रश्नाला जातीयरंग दिला जात असल्याचे म्हंटले आहे.