पंढरपूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी 2021 च्या नियोजनाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिला आहे. त्याबाबतचा आदेश आज राज्य सरकारनं काढलाय. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ( Order of MahaVikas Aghadi government issued for Ashadi Wari)
यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आलाय.
सरकारच्या आदेशानुसार यंदाही मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसनेच पंढरपूरकडे प्रस्थान करावं लागणार आहे. मात्र, वाखरीपासून दीड किलोमीटरचं अंतर पायी चालत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.
या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
3) संत सोपान काका महाराज ( सासवड )
4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
5) संत तुकाराम महाराज ( देहू )
6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
7) संत एकनाथ महाराज ( पैठण )
8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )
संबंधित बातम्या :
मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा
राजे एकत्र आले याचा आनंदच, त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे, वडेट्टीवारांची अपेक्षा
Order of Maha Vikas Aghadi government issued for Ashadi Wari