मॅचदरम्यान टाके पडले, केळी खाऊन 6 विकेट्स घेतल्या, 5 वर्षे संघाबाहेर राहिला, मग धोनीने वर्ल्ड कपसाठी निरोप धाडला
आशिष नेहराने आयपीएल 2014 मध्ये चार सामन्यात 8, तर 2015 मध्ये 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर त्याला टी 20 संघात निवडण्यात आलं.
Ashish Nehra
Follow us
भारतीय क्रिकेटमधील एका अशा गोलंदाजाचा आज वाढदिवस आहे, ज्याचा जन्म केवळ वर्ल्डकप खेळण्यासाठीच झालाय की काय असं वाटावं. ज्या ज्या वेळी तो वर्ल्डकपमध्ये खेळला, त्या त्या वेळी त्याने आपली छाप सोडली. हा गोलंदाज म्हणजे आशिष नेहरा. 29 एप्रिल 1979 रोजी जन्मलेला नेहरा भारताकडून 2003, 2011 आणि 2016 वर्ल्ड टी20 मध्ये खेळला. या स्पर्धांमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
आशिष नेहराने 1999 मध्ये कसोटी क्रिकेटद्वारे भारताकडून पदार्पण केलं. मात्र या फॉरमॅटमध्ये तो जास्तकाळ चालला नाही. 2004 मध्ये नेहरा शेवटची कसोटी खेळला. दरम्यान नेहराने 2001 मध्ये वन डेमध्ये पदार्पण केलं. त्याने 2003 च्या विश्वचषकात कमाल केली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नेहराने 10 षटकात 23 धावा देऊन तब्बल 6 विकेट घेतल्या. नेहराच्या तुफान गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ ढेपाळला. या सामन्यात नेहराला दुखापत झाली होती. तरीही त्याने गोलंदाजी केली. त्याचा पाय सूजला होता, तरीही तो मैदानात उतरला. मैदानात त्याला उलट्या होत होत्या, मात्र केळी खाऊन त्याने गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या फलंदाजीची वाट लावली.
आशिष नेहरा आणि दुखापत हे जणू समीकरणच बनलं होतं. त्यामुळे त्याला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याचाच परिणाम म्हणून नेहरा अनेकवेळा मैदानाबाहेर राहिला. नेहराला धोनीने 2011 च्या विश्वचषकासाठी निवडलं होतं. यावेळी त्याने भन्नाट बोलिंग केली. पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनच्या सामन्यात त्याने टिच्चून मारा केला. नेहराने 10 षटकात केवळ 33 धावा देत 2 विकेट्स घेऊन, पाकिस्तानला चांगलंच आवळून ठेवलं. मात्र त्याच सामन्यात त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे त्याला फायनलमध्ये खेळता आलं नाही आणि पाकिस्तानविरुद्धचा तो सामना नेहरासाठी अखेरचा ठरला.
2011 च्या वर्ल्डकपनंतर नेहरा पाच वर्षे टीम इंडियाच्या बाहेर राहिला. त्याला कोणत्याच फॉरमॅटमध्ये संधी मिळाली नाही. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करुनही आपण संघाबाहेर का आहे, याचं उत्तर नेहरा मागत होता. मात्र 2014 मध्ये आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला आणि त्याचं नशीब पालटलं.
आशिष नेहराने आयपीएल 2014 मध्ये चार सामन्यात 8, तर 2015 मध्ये 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर त्याला टी 20 संघात निवडण्यात आलं. भारताकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी 20 सामन्यात खेळला. त्यानंतर नेहराला वर्ल्ड टी 20 मध्येही निवडण्यात आलं. त्याने 5 सामन्यात 5 विकेट घेतल्या. त्यानंतर नेहराने 2017 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आशिष नेहराने भारतासाठी 17 कसोटीत 44, तर 120 वनडे सामन्यात 157 विकेट्स घेतल्या. याशिवाय 27 टी 20 सामन्यात 34 विकेट त्याच्या नावावर आहेत.