‘अर्थ खातं होतं त्यावेळी…’ अजित पवार याचं अर्थ खात्यावरून पुन्हा मोठं विधान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्यावरून पुन्हा एक मोठं विधान केलंय. काही काम करायची आहेत त्याचे अंदाज पत्रक तयार करा. सरकारमध्ये असल्यामुळे आपण निधी मिळवू शकतो. पण, नंतर काही म्हणू नका, असे अजित पवार म्हणाले.
बारामती : 1 ऑक्टोबर 2023 | निवडणुका जवळ आल्या. काही जण इकडे येतात आणि काहीही सांगून जातात. त्याला फार महत्व देत बसू नका. इथे जी कामे करायची आहेत त्याचे अंदाजपत्रक करा. नंतर अजितकडे अर्थ खातं होतं त्यावेळी काही कामं झाली नाहीत असं म्हणत बसायची वेळ आणू नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी तुफान फटकेबाजी केलीय. तरडोली येथील पाईपलाईन जोड प्रकल्पाचं उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
पाणी बचतीसाठी अनेक उपाययोजना राबवाव्या लागतील. सरकारमध्ये असल्यामुळे आपण निधी मिळवू शकतो. तुमच्या मनात काही कल्पना असतील तर सांगा. त्या आपल्या फायद्याच्या असतील तर आपण त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करु. जिरायत भागातील २२ गावांमधील शेतीला पाणी मिळावं यासाठी काही योजना आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
जलसंधारणाची कामे हाती घ्या
ओढ्या नाल्यांना जितकं पाणी येईल तितकं भुगर्भातील पातळी वाढेल. त्यातून आपल्या पाण्याचा प्रश्न मिटवायला मदत होईल. जलसंधारणाची अनेक कामे जाती घेतोय. पाऊस गरजेचा आहे.. पाऊस नसेल तर मग अडचणी येतात. माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामे हाती घ्या असे त्यांनी सांगितले.
पाणी आलं की लगेच ऊस
आपली जिल्हा बॅंक अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करुन देतेय. पूर्वीसारखं सावकाराच्या दारा जावं लागत नाही. तुम्ही फक्त वेळेत परतफेड करा. द्राक्ष आणि डाळींबासारख्या पिकातून मोठं उत्पन्न मिळतंय. रेशीमकोश प्रकल्पही फायदेशीर ठरतोय. वेगवेगळ्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे लक्षात घेवून शेती करा. पाणी आलं की लगेच ऊस लावू नका. इतर पिकांकडे लक्ष द्या. नाय तर घे कांडं आणि दाब बेणं, असं व्हायचं अशी फटकेबाजी त्यांनी केली.
एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढायचं बंद करा. आपण सगळे एक आहोत ही भावना मनात ठेवून शासनाच्या योजना राबवण्याचं काम करा. आम्ही रस्ते करतोय आणि तुम्ही पाईपलाईन टाकायला रस्ते खोदताय. त्यासाठी सर्व्हिस लाईनचा पर्याय आहे. अजून मी दंड आकारायला लावला नाही. पण, पाईपलाईन मालकाला दंड केला तर मग कसं होईल, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.