शरद पवार आंदोलनस्थळी, दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘अशा घटना घडतात तेव्हा ते…’
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तातडीने जालना येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. नंतर त्यांनी राज्यसरकारवरही टीका केली. त्यावरून शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
मुंबई : 2 सप्टेंबर 2023 | जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये सुमारे तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात मराठा समाजाने आंदोलन सुरु केले आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलकांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यसरकारवर टीका केली. त्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.
जालना येथे जी घटना घडली त्याची योग्य चौकशी व्हायला हवी. ही घटना घडली ती व्ह्यायला नको होती. राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. अशा वेळी विरोधी पक्षाकडून राजकारण केले जाते असे वाटत नाही. शासनाचे प्रतिनिधी कुणी तरी जालनामध्ये जातील. पण, अशावेळी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांची मागणी होत असते, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
जालनामध्ये जी काही घटना घडली. त्याप्रकारची प्रकरणे अधिक समजदारपणे हाताळायला पाहिजे. काही घटक अशा घटनांचा फायदा घेतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण, अशी घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस पोलिसांनी खूप संयमाने परिस्थिती हाताळावी लागते असे वळसे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाचे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी एवढी आक्रमक भूमिका का घेतली हा चौकशीचा भाग आहे असे ते म्हणाले. या घटनेची चौकशी केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही. काल तिथं काय गडबड झाली हे चौकशीअंती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लाठीचार्ज झाल्याची माहिती मिळताच शरद पवार तातडीने जालना येथे गेले, हा राजकारणचा भाग आहे का असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, समाजामध्ये असे काही घटक असतात ज्यांना समाजामधील शांतता बिघडवाची असते आणि त्याचा फायदा ते घेत असतात. पवार साहेब लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी जालना येथे गेले आहेत. ज्या वेळेस अशा घटना घडतात तेव्हा ते लगेच तिथे जातात. समाजामध्ये नेहमी हे वेगळी भूमिका मांडतात त्यातून हे घडल असावं असे ते म्हणाले.