बीडमध्ये चित्रपटगृहासमोरच अभिनेता-दिग्दर्शकाला बेदम मारहाण
'बायको देता का बायको' या चित्रपटातील अभिनेते आणि दिग्दर्शकाला बीडमध्ये बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
बीड : ‘बायको देता का बायको’ या चित्रपटातील अभिनेते आणि दिग्दर्शकाला बीडमध्ये बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे (Attack on Actor Director in Beed). सुरेश साहेबराव ठाणगे असं या दिग्दर्शकाचं नाव आहे. जमावाने चित्रपटगृहासमोरच सुरेश ठाणगे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
अभिनेते आणि दिग्दर्शक सुरेश ठाणगे प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्यासाठी बीडमधील आशा टॉकीज या चित्रपटगृहात आले होते. शो संपल्यानंतर चित्रपटगृहाच्या बाहेर ठाणगे यांच्याभोवती चाहत्यांनी गर्दी केली. मात्र, या गर्दीतूनच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात सुरेश ठाणगे आणि त्यांचे सहकारी धनंजय यमपुरे हे दोघेही जखमी झाले आहेत.
या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा हल्ला का झाला? हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जमावातील काही लोक मारहाण करताना अभिनेता आणि दिग्दर्शकावर शेतकऱ्यांची बदनामी केल्याचा आरोप करत आहेत. हल्लेखोरांनी चित्रपटगृहाच्या मालमत्तेचीही तोडफोड केली आहे. सध्या आरोपी फरार आहेत. या व्हिडीओच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Attack on Actor Director in Beed