Aurangabad Lockdown : ‘होय माझी चूक झाली, पण नियम मोडणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई करा’- जलिल
खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असं जलिल यांनी म्हटलंय.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्यानंतर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यांच्या या कृतीवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर अखेर खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असं जलिल यांनी म्हटलंय. पण आपली चूक मान्य करतानाच त्यांनी नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.(Aurangabad MP Imtiaz Jalil admits mistake, but criticizes Chandrakant Patil)
लॉकडाऊन रद्द, खासदार जलिल यांचा जल्लोष
“होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायद्या त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा”, अशी मागणी जलील यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण या निर्णयाला जलिल यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. जलिल यांनी तर या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचे आदेश काल देण्यात आला.
लॉकडाऊन रद्दच्या निर्णयानंतर जलिल आणि त्यांचे काही कार्यक्रर्ते रस्त्यावर उतरले. समर्थकांनी जलिल यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूकही काढली होती.
चंद्रकांत खैरेंकडून जलिल यांच्या अटकेची मागणी
“औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर चंद्रकांत खैरे यांना कायद्याचं ज्ञान नाही. त्यामुळे ते काहीही बोलतात, असा टोला जलिल यांनी लगावला आहे.
“नाचताना शरम वाटायला पाहिजे”
“MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 31, 2021
संबंधित बातम्या :
इम्तियाज जलील यांचा धांगडधिंगा, खैरेंकडून अटकेची मागणी, खोपकर म्हणतात नाचताना शरम वाटली पाहिजे
Aurangabad Lockdown : औरंगाबादकरांना मोठा दिलासा, लॉकडाऊन रद्द करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय
Aurangabad MP Imtiaz Jalil admits mistake, but criticizes Chandrakant Patil