Aurangabad | समृद्धी महामार्गाची बेतोड मजबुती, 150 स्पीडने वाहन गेले तरी व्हायब्रेशन जाणवणार नाही, काय आहे तंत्र?
नागपूर ते मुंबई हा 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग असेल. 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना हा मार्ग जोडतो. याची गती मर्यादा 150 किमी आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 8 तासात कापले जाईल.
औरंगाबादः विदर्भ आणि मराठवाड्याच्या समृद्धीच्या आशा उंचावरणारा समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) एकेक टप्प्यावरील बांधकाम पूर्ण होत आहे. त्यानुसार, महामार्गावरील आकर्षक आणि मजबुतीची वैशिष्ट्ये पुढे येत आहेत. या महामार्गाच्या दणकटतेचा आणखी एक गुण समोर आला आहे. नागपूर-मुंबईला (Nagpur Mumbai) जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरून ताशी 150 किलोमीटर या वेगाने वाहन गेले तरीही वाहनात बसलेल्यांना हादरे जाणवणार नाहीत. देशात पहिल्यांदाच महामार्गाच्या एका बाजूच्या 16.50 मीटरच्या 4 मार्गिका ऑटोमेटेड मशीनद्वारे बांधल्या जात आहेत. त्यामुळे काँक्रिटचा थर एकसारखा पसरतो. वाहने स्थिर राहतात. तसेच पुलांच्या दोन प्लेट्समधील सांध्यात रबर्स वापरण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचे व्हायब्रेशनही जाणवणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. ताशी 150 किमी वेग (150 km\h) मर्यादेसाठी डिझाइन केलेला हा पहिलाच महामार्ग आहे.
एवढ्या गतीमुळे काय धोका?
एखादे वाहन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून वेगाने जात असेल तेव्हा टायरच्या घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता असते. मात्र सध्या सेव्हन प्लाय रेटिंग आणि ट्यूबलेस टायर वापरला जाते. तसेच साध्या हवेसोबतच टायरमध्ये नायट्रोजन भरला जातो. या वायूचे तापमान वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे टायर फुटण्याच्या घटना होण्याची शक्यता कमी आहे, असे म्हटले जात आहे.
व्हायब्रेशन अडवण्याचे तंत्र काय?
समृद्धी महामार्गावरील पुलांच्या दोन प्लेटमधील सांध्यात रबर्स वापरले आहेत. यामुळे वाहनाला बसणारे हादरे शोषून घेण्याचे काम केले जाते. त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनांना व्हायब्रेशन जाणवणार नाही. रस्त्याच्या सर्वात खालच्या स्तरावर ग्रेडेशन खडीचा 150 मिमीचा थर आहे. तो ओलाव्यापासून रस्त्याचे संरक्षण करतो. त्यानंतर 150 मिमीचा ड्राय लीन काँक्रिटचा दुसरा थर तर 310 मिमीचा पेव्हमेट क्वालिटी काँक्रीटचा थर असेल. यात सिमेंटचे प्रमाण जास्त आहे.
समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार?
नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. मार्च 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. तसेच पुढील दोन महिन्यात नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
कसा आहे मार्ग?
नागपूर ते मुंबई हा 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग असेल. 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना हा मार्ग जोडतो. याची गती मर्यादा 150 किमी आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 8 तासात कापले जाईल. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास वेळ लागेल, या मार्गामुळे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, वर्धा व जालना कोरडे बंदरे आणि मुंबईच्या जेएनपीटीला जोडली जातील.
इतर बातम्या-