औरंगाबादः एका उंदराच्या (Rat) कारनाम्याची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून शहरात आहे. उंदरामुळे तब्बल 13 तास पाणीपुरवठा (water supply) खंडित झाला. कोर्टात आधीपासूनच शहरातल्या पाणी पुरवठ्याचा वाद आहे. त्यामुळे हायकोर्टालाही या प्रकारावर गंभीर टिप्पणी करावी लागली. उंदरामुळे वारंवार पाणी गळती होणं हा तर टॉम अँड जेरीच्या खेळासारखा प्रकार झाला, असं कोर्टानं म्हटलंय. हे घडलंय औरंगाबाद (Aurangabad) शहरात. दोन दिवसांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंपगृहात दोन दिवसांपूर्वी उंदरामुळे शॉर्ट सर्किट झालं. तब्बल 11 तास पाण्याचा उपसा बंद झाला.
सोमवारी पहाटेच पंपगृहातल्या मेनहोलमध्ये उंदीर शिरला. स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नव्या आणि जुन्या अशा दोन्ही योजनांचा पाणी उपसा सुरु होण्यासाठी 13 तास लागले. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
त्यामुळे शहराला किमान तीन दिवसांनी पाणीपुरवठा झालाच पाहिजे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिले. हे करणं का अशक्य आहे, याची कारणं मनपाकडून मांडण्यात आली. त्यांचाही न्यायमूर्तींनी कडक शब्दात समाचार घेतला.
आगामी महापालिका निवडणुकीत औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्ह आहेत. शहरातील जुन्या पाणीपुरवठा योजनेची दैन्यावस्था झाली असून नवी पाणीपुरवठा योजना अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे शहराला कुठे पाच तर कुठे सहा, सात दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यातच जीर्ण झालेल्या जलवाहिनीत बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याचं वेळापत्रकही पूर्ण कोलमडतं. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर भाजपने या मुद्द्यावरून चांगलाच निशाणा साधला आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता. त्याला शिवसेनेही प्रत्युत्तर देत, तुम्हीही सत्तेत असताना काय केलं, असा सवाल विचारला आहे.