औरंगाबाद: अभ्यासाचा अति ताण आल्याने दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औरंगाबादमधील (Suicide in Aurangabad) सिडको एन9 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी झोपण्यासाठी खोलीत गेलेला मुलगा शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी बाहेर आलाच नाही. हे लक्षात आल्यानंतर आई उठवण्यासाठी गेली असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले.
औरंगाबादच्या सिडको परिसरातील एन-९ मध्ये राहणारा निखिल इयत्ता दहावीत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत आहेत, तर आई गृहिणी आहे. निखिल याला एक लहान भाऊ आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने निखिल ऑनलाइन शिक्षण घेत होता. शुक्रवारी दिवसभर ऑनलाइन क्लास आणि अभ्यास करून त्याने रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो खोलीत झोपण्यासाठी गेला. शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी निखिल खोलीतून बाहेर न आल्याने आई त्याला उठवण्यासाठी गेली. मात्र तेव्हा निखिल खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.
निखिलच्या घरातील आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनी निखिलच्या खोलीकडे धाव घेतली. सिडको पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. निखिलला खाली उतरवून घाटीत दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत निखिलचा मृत्यू झालेला होता. शवविच्छेदनानंतर निखिलचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान निखिलने त्याच्या वहीत आत्महत्येचे कारणही लिहून ठेवले. ‘माझे दहावीचे वर्ष आहे, मात्र अभ्यास समजत नाही, पाठांतर केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येक जण मला बोलतो, मित्रही हसतात…,’ ही व्यथा त्याने वहीत लिहून ठेवली. यावरून निखिल अभ्यासाच्या तणावाखाली होता, हे दिसून येते. या प्रकाराने विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणाचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मानसिक आरोग्यासंबंधीच्या एका अहवालानुसार, देशातील 30 टक्के व्यक्ती नैराश्याने ग्रस्त आहेत. तर 40 टक्के व्यक्तींचा चिंतारोग (अँक्झायटी) आहे. तसेच सातपैकी एका व्यक्तीला कमी-अधिक तीव्रतेचा मानसिक आजार आहे. तरीही मानसिक आजारांचे पुरेसे गांभीर्य समाजाला तसेच सरकारला लक्षात येत असल्याचे दिसत नाही. मानसिक आजारांचे झपाट्याने वाढणार प्रमाण पाहून मानसिक आजारांना साथरोग जाहीर केली पाहिजे. नेमक्या स्थितीची शास्त्रशुद्ध चाचपणी करून ऑनलाइन-ऑफलाइन व्यापक जनजागृती मोहीम व उपाययोजना सुरु केल्या पाहिजेत. यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे, असे मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी व्यक्त केले.
इतर बातम्या-
Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी
औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?