औरंगाबादः दिवळीपर्यंत सोन्याचे भाव वाढत जाणार असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या प्रमाणे दसऱ्यानंतर सोन्याच्या भावांत कायम वाढ सुरु आहे. मात्र आज अनेक दिवसांनी सोन्याच्या दरात थोडी घसरण (Gold Price ) झालेली पहायला मिळाली. बाजारातील चढ-उतारानुसार हे दर कमी-जास्त होत राहतात, असे जाणकारांनी सांगितले आहे. तरीही दिवाळीनिमित्त सोन्याचे दागिने खरेदी करायची इच्छा असलेल्यांना सध्या चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारी डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव आज 0.12 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी, चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.
गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोने रेकॉर्ड पातळीपेक्षा 8059 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. अर्थातच औरंगाबादच्या बाजारातील भावावरही याचा परिणाम झाला. सराफा बाजारातील सोन्याच्या दरात काहीशी घसरण दिसून आली.
औरंगाबादच्या बाजारात आज सोन्याच्या भावांमध्ये 50 ते 200 रुपयांची घसरण दिसून आली. आज मंगळवारी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवण्यात आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,800 रुपये एवढे नोंदले गेले. 25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.
भारतात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयातही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe यांसारख्या अनेक मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्मवर 1 रुपयात सोने खरेदी करू शकता. डिजिटल सोन्याची खरेदी फिजिकल सोन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. फिजिकल सोन्यात तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने किंवा बार किंवा क्वाईन खरेदी करता आणि त्यांचा वापर करता, पण इथे तसे नाही. आपण येथे डिजिटल सोन्याला फिजिकल स्पर्श करू शकत नाही. सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षेची चिंता नाही, कारण इथे सोने शुद्ध आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल सोने गुंतवणुकीचे प्रमुख माध्यम म्हणून उदयास आले आहे. Google Pay प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला लॉगिन केल्यानंतर खाली स्क्रोल करावे लागेल आणि गोल्ड आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर मॅनेज युवर मनीमध्ये गोल्ड बायचा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्ही एक रुपयामध्येसुद्धा डिजिटल सोने खरेदी करू शकता. तसेच 3% जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी केले, तर तुम्हाला 0.9 मिग्रॅ मिळेल. खरेदी व्यतिरिक्त सोन्याला विक्री, वितरण आणि भेटवस्तू यांचाही पर्याय मिळेल. जेव्हा तुम्हाला सोने विकावे लागते, तेव्हा तुम्हाला सेल बटणावर क्लिक करावे लागते. गिफ्टसाठी गिफ्टचा पर्याय निवडावा लागतो.