वरळीतून नाही, ठाण्यातून नाही… आता आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना नवं आव्हान; एकनाथ शिंदे आव्हान स्वीकारणार?
वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर उद्योग का जातात? त्यावर माझ्याशी समोरासमोर चर्चा करा असं आव्हान मी दिलं होतं. पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यानंतर एअरबस गेलं. बल्क ड्रग्सपार्क असेल.
औरंगाबाद: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातूनही निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही आव्हाने शिंदे यांनी स्वीकारली नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं आव्हान दिलं आहे. राज्याच्या अधिवेशनापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवून दाखवा, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे आदित्य ठाकरे यांचं हे नवं आव्हान तरी स्वीकारतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वरळीतून लढून दाखवण्याचं मी काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. वरळीतून नसेल तर ठाण्यातून तरी लढून दाखवा असं मी त्यांना सांगितलं. मी त्यांना आणखी एक चॅलेंज देतो. त्यांची माझ्या विरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवावं, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं.
वॉर्डातून लढणार का?
राज्यपालांना जायचं आहे. त्यांनी तसं पंतप्रधानांना कळवलं आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर बोलत नाहीत. हे चित्रं महाराष्ट्रासाठी घातक आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री शिंदे माझ्याविरोधात वॉर्डातून लढण्यास तयार असतील तर मी वॉर्डातून लढण्यास तयार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्यावर ते बोलू शकले नाही
यावेळी त्यांनी वेदांता फॉक्सकॉनवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर उद्योग का जातात? त्यावर माझ्याशी समोरासमोर चर्चा करा असं आव्हान मी दिलं होतं. पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यानंतर एअरबस गेलं. बल्क ड्रग्सपार्क असेल. काल परवा 26 हजार कोटीचा प्रकल्पही राज्यातून गेला. उद्योगावर ते बोलू शकले नाहीत आणि चॅलेंज स्वीकारू शकले नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
एवढा खर्च होऊच कसा शकतो?
गुवाहाटीला ते डोंगर झाडी बघायला गेले होते. तसेच दावोसला ते बर्फ बघायला गेले होतो. 28 तासात 40 कोटी एवढा खर्च होऊच कसा शकतो? उधळपट्टी करायची ठरवली तरी 40 कोटींचा खर्च होणारच कसा? हा प्रश्न मला पडला. त्यावर चर्चा करण्याचं आव्हान दिलं होतं, असंही ते म्हणाले.