औरंगाबाद: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच पक्षांनी ग्रामीण स्तरावर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना (Aurangabad Shiv Sena), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा विविध पक्षांमध्ये नव्या कार्यकर्त्यांचं इन्कमिंग सुरु आहे. काही भागात न पोहोचलेले पक्ष त्या-त्या ठिकाणी आपल्या पक्षांच्या शाखा स्थापन करत आहेत. तर भाजप, शिवसेनेसारखे पक्ष स्थानिक कार्यकर्त्यांच्या थेट गाठी-भेटी घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. भाजपने काही दिवसांपूर्वीच ग्रामीण भागात डबा पार्टीच्या मोहिमेला प्रारंभ केला. तर शिवसेनेनेही अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वात शिवसंवाद मोहीम आयोजित केली. आता सिल्लोड आणि सोयगावातील शिवसेनेला आणखी बळकटी देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवतेज अभियानाला सुरुवात केली आहे.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सरशी झाली. अजूनही भाजपचे अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात असून लवकरच सिल्लोड-सोयगावातून भाजप हद्दपार करणार, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड-सोयगावातील पाच हजार भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सिल्लोडमध्ये त्यांनी शिवसेनेच्या शिवतेज अभियानाला सुरुवात केली. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते गुरुवारी बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये शिवतेज अभियानाला सुरुवात केली आहे. फुलंब्री येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी अभियानाला सुरुवात केली. यावेळी सत्तार यांच्यासोबत माजी महापौर कला ओझा, राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, किशोर बलांडे आदी उपस्थिती होते. औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात दोन लाख तर औरंगाबाद महापालिका हद्दीत सव्वा लाख मतदार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा या मतदार संघावर कब्जा करून भगवा फडकवायचा आहे. येत्या आठ दिवसात पानवाडी गावाचा समावेश फुलंब्री नगर पंचायतमध्ये होईल. यासाठी लवकरच अध्यादेश काढला जाईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. आता सिल्लोड, सोयगावात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी सुरु केलेल्या शिवतेज अभियानाला किती प्रतिसाद मिळतो, हे आगामी काळात दिसून येईल.
दरम्यान, शिवतेज अभियानात माजी लोकसभा खासदार चंद्रकांत खैरे हेही उपस्थित होते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता हॉस्पिटलमध्ये राहून माझ्याविरोधात काम केले तर जावयाचा प्रचार करण्यास कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. पण नियती पाहा, त्यांचा जावईदेखील त्यांच्यासोबत नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.
इतर बातम्या-