Sanjay Raut | देशाचं नेतृत्व करण्याची ताकद फक्त उद्धव ठाकरेंमध्ये! संजय राऊतांचा दावा, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ' देशात असंख्य प्रश्न आहेत पण त्यावर कुणी बोलायला तयार नाही. महागाईच्या झळा जनतेला बसत आहेत पण मोदी शाहाला बसत नाहीत.
औरंगाबादः आजच्या घडीला देशाचं नेतृत्व करण्याची ताकद फक्त उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackeray) आणि या महाराष्ट्रात आहे, असा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला. औरंगाबाद येथील शिवसेनेच्या विराट सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं. काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंदुंच्या हत्यांवरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. काश्मीरी पंडितांना (Kashmiri Pandit) आता फक्त हिंदुहृदय सम्राट उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत, असंही राऊत म्हणाले. औरंगाबादमधील शिवसेनेच्या शाखेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी संजय राऊत यांचं भाषण झालं. या भाषणात त्यांनी औरंगाबादमध्ये भाजपने काढलेल्या जलाक्रोश मोर्चावरही टीका केली. आक्रोश ऐकायचा असेल तर काश्मीरी पंडितांचा ऐका, असा सल्ला राऊतांनी दिला.
काय म्हणाले संजय राऊत?
‘ मुख्यमंत्री हे या देशामध्ये जे पहिल्या क्रमांकाचे पाच मुख्यमंत्र्यांमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत. मग आक्रोश मोर्चा कशासाठी? आक्रोश पाहायचा असेल तर या नामर्दांनी काश्मिरमध्ये जाऊन काश्मिरी पंडितांचा आक्रोश पाहावा… हिंदू हिंदू करताय… तिकडे काश्मिरी पंडितांच्या हत्या सुरु आहेत आणि हे सरकार नामर्दासारखं हातावर हात घेऊन बसलंय. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय… संपूर्ण काश्मिर आपल्याकडे आशेने पाहतोय. उद्धव ठाकरे आम्हाला आधार देतील अशी आशा ते बाळगून आहेत. काश्मिरी पंडितांना आधार देण्याचं पहिलं काम बाळासाहेबांनी केलं. तेच काम आपल्याला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात करयाचं आहे.’, असं संजय राऊत म्हणाले.
‘देशाचं नेतृत्व करण्याची ताकद उद्धव ठाकरेंकडे’
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ देशात असंख्य प्रश्न आहेत पण त्यावर कुणी बोलायला तयार नाही. महागाईच्या झळा जनतेला बसत आहेत पण मोदी शाहाला बसत नाहीत. महागाईवर प्रश्न विचारले तर हे ज्ञानवापीवर बोलतात. बेरोजगारीवर बोललं तर ताजमहालाखाली शिवलिंग शोधण्याबाबत बोलतात. अरे ते चीनच्या ताब्यात असलेलं कैलास मानस सरोवर आमच्या ताब्यात द्या. पण तेवढी हिंमत त्यांच्यात नाही. महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारनं देशाला दिशा दिली आहे. संपूर्ण देश उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. एकाच नेत्याचं नाव आज देशाच्या तोंडी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. देशाचं नेतृत्व करण्याची ताकद आज एकाच नेत्यामध्ये आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे.’