Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उंच, आता डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचीही उंची वाढवण्याची मागणी!
शुक्रवारी विविध आंबेडकरी संघटनांकडून महापालिका मुख्यालयासमोर या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सर्वसाधारण सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बदलण्यासंदर्भातील निर्णयाच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले
औरंगाबादः शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj Statue) पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती. अखेर या वर्षी क्रांती चौकात शिवाजी महाराजांचे सर्वोच्च शिल्प नुकतेच उभारण्यात आले. आता शहरातील भडकल गेट येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याची उंचीही वाढवण्याची मागणी आंबेडकरी संघटनांकडून होत आहे. त्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका (Aurangabad municipal corporation) मुख्यालयासमोर धरणे दिली. अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सर्वसाधारण सभेत यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिले.
आधीही आश्वासन, मात्र अंमलबजावणी नाही…
यासंदर्भात माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी 9 जानेवारी 2013 रोजी मनपाच्या सभेत हा विषय मांडला होता. त्यावेळी तो एकमताने मंजुरही झाला. मात्र त्याची अंमलबजावणी आजवर झाली नाही. तसेच भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यात तांत्रिक त्रुटी असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. या पुतळ्याच्या दिशेत फरक असून पुतळ्याच्या मानेचा भाग दिसत नाही. त्यामुळे हा पुतळा बदलून, चबुतऱ्याची उंची वाढवून नवीन पुतळा बसवण्यात यावा, असी मागणी कृती समितीने निवेदनाद्वारे केली.
निर्णयाच्या अंमलबजावणीचे आश्वासन
दरम्यान शुक्रवारी विविध आंबेडकरी संघटनांकडून महापालिका मुख्यालयासमोर या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सर्वसाधारण सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बदलण्यासंदर्भातील निर्णयाच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले. यावेळी दिनकर ओंकार, श्रावण गायकवाड, प्रकाश निकाळजे, मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, कैलास गायकवाड आदींची उपस्थिती होती.
शिवाजी महाराजांचा सर्वोच्च पुतळा
काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोच्च पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची 52 फूट असून देशातील सर्वात उंच हे शिल्प आहे. 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मोठ्या गाजावाजात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
इतर बातम्या-