Aurangabad Airport खासगीकरणाला वेग, जमिनीचे मोजमाप सुरु, कंपन्यांद्वारे चाचपणी
विमानतळ खासगीकरणाला गती मिळत असून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी ही माहिती दिली.
औरंगाबादः औरंगाबाद विमानतळाचा (Aurangabad airport) ताबा आगामी काळात खासगी कंपन्यांच्या हाती सोपवला जाणार आहे. सध्या हे विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. केंद्र सरकारकडून देशातील 17 विमानतळांचे खासगीकरण (Airport privatization) करण्यात येत असून यात औरंगाबादचाही (Aurangabad city) समावेश आहे. विमानतळ खासगीकरणाला गती मिळत असून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चलनीकरण योजनेअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
देशातील किती विमानतळांचे खासगीकरण?
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चलनीकरण योजनेची घोषणा केली होती. या माध्यमातून तोट्यात असलेल्या सरकारी उपक्रमांच्या मालमत्ता विकून निधी उभारण्याची योजना आखली. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 13 विमानतळांचे खासगीकरण करण्यात येत आहे. यात औरंगाबादसह वाराणसी, कुशीनगर, गया, अमृतसर, कांग्रा, भुवनेश्वर, तिरुपती, रायपूर, इंदूर, जबलपूर, त्रिची, हुबळी आदी विमानतळांचा समावेश आहे. राष्ट्रीय चलनीकरण योजनेअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
औरंगाबाद विमानतळाची स्थिती काय?
सध्या औरंगाबाद विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असला तरीही येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देणे बाकी आहे. येथे मोठे विमान उतरण्याची सुविधा नाही. येथील धावपट्टीच्या विस्तारीकरणासह एस-बँड डॉपलर वेदर रडार, कार्गो सेवेचा विस्तार व इतर सुविधा बाकी आहेत. खासगीकरण झाल्यास या गोष्टी पूर्ण होतील, सोयी सुविधा मिळाल्यास प्रवासी वाढतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला. अनलॉकच्या प्रक्रियेत टप्प्या-टप्प्याने प्रवासीसेवा पूर्ववत झाली तरीही विमान प्रवाशांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळ हे गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात राहिले आहे.
इतर बातम्या-