Aurangabad | अजिंठा पर्यटक केंद्रात दरोडेखोरांचा सात तास थरार, ट्रान्सफॉर्मर फोडून ऑइल, कॉपरची चोरी!
पहाटे सुरक्षारक्षक खोलीतून बाहेर आले. एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी श्वानपथकासह जागेची पाहणी केली. फर्दापूर पोलिसांतर्फे 11 अज्ञातांचा शोध सुरु आहे.

औरंगाबादः जिल्ह्यातील अजिंठा पर्यटक केंद्रात (Ajanta Tourist center) रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास 11 दरोडेखोरांनी (Robbery) मोठा हैदोस घातला. येथील सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण केली. त्यांना एका खोलीत डांबून ठेवलं. केंद्रातले दोन ट्रान्सफॉर्मर फोडले आणि सुरक्षा रक्षकांजवळचे दोन हजार रुपये किंमतीचे बाराशे लीटर ऑइल आणि कॉपर चोरून नेले. तसेच सुरक्षा रक्षकाजवळील रोख दोन हजार रुपयेदेखील पळवले. रात्री साडे नऊ वाता सुरु झालेलं हे नाट्य पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होता. बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत हा थरार सुरु होता. मारहाण झाल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या सुरक्षा रक्षकाच्या मोबाइलमध्ये पहाटेच्या वेळी अलार्म वाजला. त्यानंतर पहाटे या घटनेची (Aurangabad robbery) माहिती वरिष्ठांना देण्यात आली.
काय घडलं त्या दिवशी रात्री?
या थरारनाट्याविषयी पोलिसांनी दिलेली अधिका माहिती अशी की, अजिंठा पर्यटन केंद्र हे मागील 4 वर्षांपासून बंद आहे. वीजबिल न भरल्यानं इथला विद्युत पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे नेहमीच अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत बुधवारी रात्री साडे नऊ वाजता 11 दरोडेखोरांनी अजिंठा पर्यटक केंद्राच्या मागील गेटने आत प्रवेश केला. तेथे तैनात सुरक्षा रक्षकांशी बोलायला सुरुवात करत थेट लाठ्या-काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात अंबादास राऊत, गजानन भावसार, अरुण दामोदर, मिलिंद मगरे, विक्रम लोखंडे या सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.
सात तास पर्यटक केंद्रात थरार
जळगाव-औरंगाबाद मार्गालगत असलेल्या अजिंठा पर्यटक केंद्रात त्या रात्री तब्बल सात तास हा थरार सुरु होता. दरोडेखोरांनी इथं शेकोटी करुन दारुवर ताव मारला. त्यानंतर येथील ट्रान्सफॉर्मर फोडले. हा तोडफोडीचा आवाज प्रचंड मोठा होता. मात्र कुणीही इथपर्यंत धावून आले नाही. फोडलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल आणि कॉपर एका चारचाकी वाहनात हे लोक घेऊन गेले. सुरक्षा रक्षकांजवळची दोन हजार रुपयांची रक्कमही घेऊन गेले. तसेच त्यांच्या हातातील अंगठ्या हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मोबाइल घटनास्थळीच विखुरलेले
दरम्यान, दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकांचे मोबाइल घटनास्थळीच फेकून दिले होते. दरोडेखोर निघून गेल्यानंतर एकाच्या मोबाइलचा अलार्म वाजला. त्यानंतर सुरक्षारक्षक खोलीतून बाहेर आले. एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी श्वानपथकासह जागेची पाहणी केली. फर्दापूर पोलिसांतर्फे 11 अज्ञातांचा शोध सुरु आहे.
इतर बातम्या-