गावात फोर व्हिलर आणा, 51 हजार रुपये बक्षीस मिळवा, भन्नाट ऑफर कुणाची?
गावकऱ्यांनी दैनंदिन हाल अपेष्टांना कंटाळून अशी घोषणा केलीय. पण त्याचा परिणाम लोकप्रतिनिधींवर होऊन रस्त्यात काहीतरी सुधारणा होईल, अशी अपेक्षा स्थानिकांना आहे.
औरंगाबादः रोजचा त्रास संपतच नसल्यावर टोकाची भूमिका घेतल्याचं बऱ्याचदा पहायला मिळतं. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातल्या एका गावातील रहिवाश्यांनीही असाच काहीसा प्रकार केलाय. गंगागूर (Gangapur) तालुक्यातल्या आनंदवाडी गावकऱ्यांनी रोजच्या त्रासाला कंटाळून एक अजब ऑफर दिली आहे. गावात कुणी फोर व्हिलर (Four Wheeler) घेऊन आला तर त्याला 51 हजार रुपये बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणाच गावकऱ्यांनी केली आहे. अत्यंत उद्विग्नतेतून गावकऱ्यांनी ही घोषणा केली आहे. कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावाकडे येणारा रस्ताच बांधण्यात आलेला नाही, अशी व्यथा इथले गावकरी सांगतात.
स्वातंत्र्यापासून गावाला रस्ता न मिळाल्यामुळे आजही गावांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जगाशी संपर्क करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी चक्क गावात चार चाकी घेऊन येणाऱ्या व्यक्तीसाठी 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर या ऑफरची सध्या चर्चा सुरु आहे. गावकऱ्यांनी दैनंदिन हाल अपेष्टांना कंटाळून अशी घोषणा केलीय. पण त्याचा थेट परिणाम लोकप्रतिनिधीवर होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.