Aurangabad | गूगल मॅपवर पुन्हा औरंगाबाद, उस्मानाबाद! केंद्राच्या मंजुरीपूर्वीच झळकलं होतं संभाजीनगर, धाराशिव!
दोन्ही शहरांच्या नामांतर निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी नामांतर विरोधी समितीतर्फे केली जात आहे. अशातच गूगल मॅपवर अशा प्रकारे बदल केल्यामुळे एमआयएम खासदार इम्तियाज जलील तसेच इतर मुस्लिम नेत्यांनी नाराजी दर्शवली होती.
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहरांच्या नामांतरावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले असतानाच गूगल मॅपने घाई-घाईने शहराचे नाम बदलण्याचा घाट घातला होता. मात्र आता गूगलने केलेले बदल मागे घेतलं आहेत. गेल्या काही दिवसांपासून गूगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर (sambhajinagar) तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे दाखवले जात होते. आधी महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर एकनाथ शिंदे-भाजप सरकारने या शहरांच्या नामांतराचा निर्णय अग्रक्रमाने घेतला. त्यामुळे नामांतर विरोधी राजकीय पक्षांमध्ये असंतोष आहे. या दोन्ही शहरांच्या नामांतर निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी नामांतर विरोधी समितीतर्फे केली जात आहे. अशातच गूगल मॅपवर अशा प्रकारे बदल केल्यामुळे एमआयएम खासदार इम्तियाज जलील तसेच इतर मुस्लिम नेत्यांनी नाराजी दर्शवली होती. गूगल मॅपविरोधात त्यांनी तक्रार करण्याचा इशारा दिला होता. हा विरोध लक्षात घेता, गूगलवर या दोन्ही शहरांची नावं पूर्ववत करण्यात आली आहेत.
उस्मानाबादेत आज अबू आझमींची बैठक
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी विरोध दर्शवलेला आहे. उस्मानाबादमध्ये आज त्यांच्या नेतृत्वात नामांतर विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नामांतर विरोधाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी या बैठकीत काही ठोस निर्णय घेतले जातील. अबू आझमी यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेना भाजपसह महाविकास आघाडीतील नेत्यांवरही टीकास्त्र सोडतील, अशी शक्यता आहे.
खा. इम्तियाज जलील यांच्याकडून तीव्र नाराजी
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला राज्य सरकारने मंजुरी दिलेली असली तरीही केंद्र सरकारकडे हा मुद्दा प्रलंबित आहे. तत्पूर्वी नामांतर विरोधी समिती राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. तरीही गूगल मॅपवर घाई-घाईने संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यात आले. त्यामुळे औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती. गूगलने कोणत्या अधिकाराअंतर्गत हा बदल केला, असा सवाल त्यांनी केला होता.
Can @Google please explain on what basis have you changed the name of my city Aurangabad in your map! You owe an explanation to the millions of citizens with whom this mischief has been played. pic.twitter.com/yB2r2VFjlz
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) July 19, 2022
शिवसेना-भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराजी
महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना शिवसेनाप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमत्री उद्ध ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. या मंजुरीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री असतानाही हा निर्णय कसा काय घेतला गेला, यावरून मुस्लिम संघटना तसेच स्थानिक राष्ट्रवादी आणि काँग्रेस कायकर्ते प्रचंड नाराज आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप सरकारनेही या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. या दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या अजेंड्यावर हा निर्णय पूर्वीपासूनच होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपवर देखील स्थानिक नेत्यांची तीव्र नाराजी आहे.