Rare Birds | मराठवाड्यात प्रथमच दिसला दुर्मिळ शबल रणगोजा, राजस्थान, कच्छच्या रुक्ष प्रदेशातला पक्षी!
औरंगाबादेत दिसलेल्या या पक्ष्याला इंग्रजीत व्हेरिएबल व्हिटीयर (variable wheatear) असे म्हणतात. शबल रंगो सा असं बोली भाषेतील नाव असून त्याचं स्वरुप बदलत शबल रणगोजा असं नाव पडलं.
औरंगाबाद | पक्षी निरीक्षणासाठी (Bird Watching) जायचं म्हटलं की आपण स्थलांतरीत पाणपक्षी किंवा जंगलातले पक्षी तसेच गवताळ भागात जातो. मात्र सामान्य ठिकाणी देखील दुर्मिळ पक्षी दिसू शकतात. साध्या जमिनीवर म्हणजेच मुरमाड माती, पठार व ओसाड मैदानावर दिसणारे रणगोजा, मातकट रणगोजा (Shabal Rangoja) हे पक्षी खूप कमी असतात. पण कधीतरी यांचं दर्शन होत असतं. या प्रजातीतला दुर्मिळ पक्षी म्हणजेच शबल रणगोजा जो खूप कमी दिसून येतो. हा पक्षी राजस्थान,कच्छ, गुजरात भागात तसेच महाराष्ट्रात कोरड्या रुक्ष प्रदेशात येत असतो.हाच पक्षी पहिल्यांदा आपल्या मराठवाड्यात (Marathwada) मागच्या आठवड्यात दिसून आला. रविवारी म्हैसमाळ येथील पक्षी निरीक्षण करताना वनखात्याचे मानद वन्य जीव रक्षक, पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांना हा दुर्मिळ शबल रणगोजा हा परदेशी पक्षी दिसला. त्यांच्या सोबत वसीम काद्री,डॉ.प्रशांत पाळवदे,प्रतीक जोशी व नितीन सोनवणे हे पक्षीमित्र होते.
शबल रणगोजा कुठे आढळतो?
औरंगाबादेत दिसलेल्या या पक्ष्याला इंग्रजीत व्हेरिएबल व्हिटीयर (variable wheatear) असे म्हणतात. शबल रंगो सा असं बोली भाषेतील नाव असून त्याचं स्वरुप बदलत शबल रणगोजा असं नाव पडलं. हा पक्षी मूळतः अफगाणिस्तान, इजिप्त, इराण ओमन ,बलुचिस्तान,रशिया या भागातला असून हिवाळ्यात आपल्याकडे येतो. शबल रणगोजा हा पक्षी दगडी प्रदेश, मातकट सपाट मैदानावर, डोंगर पायथ्याशी, पठारावर, डोंगरावर दिसून येतो. याचा आकार 14 सेंटीमीटर असतो तसेच हा पक्षी म्युसिकापायडी या कुळातला आहे. हा छोटा हिवाळी पाहुणा हिवाळा संपला की आपल्या मूळ प्रदेशात वापस जातो आणि मार्च महिन्यामध्ये तिकडे प्रजनन करतो.
पक्षी दिसतो कसा?
– हा पक्षी काळा आणि पांढरा रंगाचा असतो. – पोटाकडील भाग हा पांढरा असतो तर वरील भाग काळपट असतो. – या पक्ष्याची शेपटी सर्व अवस्थेत काळपर पांढरी दिसून येते. – मादी नरासारखीच दिसते. फक्त काळपट रंगाऐवजी डोके मातकट तपकिरी असते आणि पोट शुभ्र पांढरे नसून दुधाळ रंगाचे असते. – हा पक्षी प्रामुख्याने जमिनीवर चालत छोटे किडे, मुंग्या, भुंगेरे, माश्या, छोटे पतंग,नाकतोडे खातो, असे डॉ किशोर पाठक यांनी सांगितले. तसेच आपल्या भागात प्रथमच हा पक्षी आल्याची नोंद झाली आहे, असेही किशोर पाठक यांनी सांगितले.
इतर बातम्या-