मोठी बातमी | औरंगाबादमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू! फर्निचरच्या दुकानात मोबाइल बॉक्समध्ये बॉम्ब? कन्नडमध्ये खळबळ
सध्या तरी संपूर्ण कन्नड शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
औरंगाबादः औरंगाबाद शहरातून एक मोठी बातमी हाती आली आहे. कन्नड शहरातील एका फर्निचरच्या दुकानात ब़ॉम्ब सदृश्य वस्तू (Bomb Like item) आढळल्यानं खळबळ माजली आहे. फर्निचरच्या दुकानात एका मोबाइलच्या खोक्यात (Mobile Box) ही वस्तू सापडली आहे. आज सकाळी दुकानदाराने मोबाइलचे खोके उघडून पाहिले तर त्यात बॉम्बसारखी वस्तू आढळली. हे पाहून दुकानदाराने तत्काळ पोलिसांना (Aurangabad police) सदर माहिती कळवली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सदर बॉम्ब सदृश्य वस्तूची पाहणी केली. हा नेमका बॉम्ब आहे की दुसरं काही आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सदर परिसर निर्मनुष्य केला आहे. बॉम्ब असेल तर तो निकामी केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
बॉम्बशोधक पथकाला पाचारण
औरंगाबादमधील कन्नड शहरात सध्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. फर्निचरच्या दुकानातील ही वस्तू नेमकी काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले आहे. ही वस्तू नेमकी काय आहे, याचा शोध घेतला जाणार असून तो बॉम्ब असेल तर पोलिसांकडून तो तत्काळ निकाम केली जाईल. सध्या तरी संपूर्ण कन्नड शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मागील आठवड्यातही बॉम्बची अफवा
दरम्यान, औरंगाबादमध्ये मागील आठवड्यातही सरस्वती भूवन कॉलेज परिसरात बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात चांगलीच खळबळ माजली होती. मात्र अखेर ती पॉवरबँक निघाली. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेनं सुटकेचा निःश्वास टाकला.