Aurangabad | शहरातल्या रस्त्यांसाठी 200 कोटींची तरतूद, तीन संशोधन केंद्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 10 मुद्दे
शहरातील नवीन रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद. ज्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि बांधणी झालेली नाही, अशा रस्त्यांची कामे या माध्यमातून होतील.
औरंगाबाद | महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी गुरुवारी शहराच्या विकासाचा पट मांडणारा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 1728 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासकांनी सादर केला. महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मांडेला हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. आगामी वर्षात महापालिकेतील (Aurangabad municipal corporation) सर्व कामांसाठी 1726 कोटी ३९ लाख ७१ हजार रुपये खर्च अपेक्षित आहेत. त्यामुळे यंदाचा 1 कोटी ७६ लाख नऊ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. त्यात महापालिकेने विविध विकास कामांसाठी प्रत्येक वॉर्डात एक कोटी विकास निधी, महापुरुषांचे पुतळे, संशोधन केंद्र यांच्यासह शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी भरीव तरतूद केली आहे.
शहरातील अर्थसंकल्पातील प्रमुख १० मुद्दे-
- शहरातील नवीन रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद. ज्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि बांधणी झालेली नाही, अशा रस्त्यांची कामे या माध्यमातून होतील.
- रस्त्यावरील दुभाजकांसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- दिव्यांगांसाठी 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आळी आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी शहरात 18 कलमी कार्यक्रम राबवला जाईल.
- तीन नवी संशोधन केंद्रे स्थापन केली जातील. यात स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान महावीर संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी मागणी होती.
- संशोधन केंद्रांसाठी प्रत्येकी दोन कोटी याप्रमाणे सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- प्रशासकीय खर्चासाठी 353 कोटी रुपये खर्च केले जातील. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन 241.93, आऊटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांचे वेतन 28.55 कोटी, कर्मचाऱ्याचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती एक कोटी, इतर प्रशासकीय खर्च 14 कोटी, सेवानिवृत्ती वेतन 67.87 कोटी खर्च अपेक्षित आहे.
- शहरातील भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासोबतच सौंदर्यीकरण करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार, अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- टीव्ही सेंटर येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी एक कोटी, वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यासाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार, त्यांच्या वॉर्डात आवश्यक ती विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे 115 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- मागील वर्षातील अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 560 कोटी तर तीन वर्षात 836 कोटींची वाढ झाली आहे.
शहरात कोणती विकासकामे?
महापालिकेने कांचनवाडी, शहानूरवाडी येथे महापालिकेच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचे नियोजन केले आहे. घन कचरा व्यवस्थापनाअंतरग्त ट्रान्सफर स्टेशन, शहराच्या सीमेवर प्रवेशद्वार, शहाबाजार येथे कत्तलखाना, मांस,मासे विक्रेत्यांसाठी स्टॉल्स, पालिकेचे उर्वरीत पेट्रोल पंप, कांचनवाडी, शहानूरमियाँ दर्गा येथे व्यापारी संकुल, सेंट्रल नाका येथे प्रशासकीय इमारत ,महापालिकेच्या विविध उद्यानांत मनोरंजन पार्क, साहसी खेळ बीओटी तत्त्वावर, गरवारे क्रीडा संकुल येथे जलतरण तलाव आदी विकास कामे केली जाणार आहेत, असं आश्वासन अर्थसंकल्प सादर करताना प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिलं.
इतर बातम्या-