‘संभाजीनगरातला राडा भाजप आणि MIM ने घडवला, यांना शहरात दंगल पाहिजे’, अंबादास दानवे यांचा प्रहार

| Updated on: Mar 30, 2023 | 10:08 AM

भाजप आणि एमआयएमचा जनाधार कमी होतोय, म्हणून शहरातील वातावरण बिघडवलं जातंय, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय.

संभाजीनगरातला राडा भाजप आणि MIM ने घडवला, यांना शहरात दंगल पाहिजे, अंबादास दानवे यांचा प्रहार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर: शहरातील (Sambhaji Nagar) किराडपुरा (Kiradpura Dangal) परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढा. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. शहरात किराडपुरा राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात तुफान राडा झाला. शाब्दिक वाद, हाणामारी, दगडफेक झाली. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. शहरातील या दंगलीनंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.

यांना शहरात दंगल हवी आहे…

शहरात काल उसळलेल्या दंगलीनंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी या भागाची पाहणी केली. तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही दौरा केला. त्यांच्यासोबत माजी महापौर नंदकुमार घोडेले, इतर शिवसेनेचे कार्यकर्ते होते. गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरु असलेल्या आंदोलनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ हे का घडलं, घडवणारे कोण यामागे जाण्याची आवश्यकता आहे. मागच्या महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे.

याला जबाबदार कोण आहे… मुस्लिमांच्या बाजूने एमआयएमसारखी संघटना १०-१० दिवस आंदोलन करते. पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, हे हात तोडले पाहिजेत. जे संरक्षण करतात, ते हात तोडलेच पाहिजेत.या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. त्यांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय. मात्र या लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

संदीपान भुमरे काय म्हणाले?

संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीदेखील आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. किराडपुऱ्यात दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांना थारा मिळणार नाही. यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र विरोधी पक्षाचे नेते विनाकारण यावरून राजकारण करत आहेत, असा आरोप भुमरे यांनी केलाय.