Aurangabad | भोंग्यावर बोलणाऱ्यांना चरोटाही येणार नाही, संकटात जनताच अडचणीत येते, औरंगाबादेत छगन भुजबळांची फटकेबाजी
आज भोंगे लावणारे आणि भोंग्यांसाठी बोलणारे उद्या घरात बसतील. पण संकट येतं तेव्हा जनताच अडचणीत सापडते. लोकांना पाऊस पाहिजे, अन्न, पाणी पाहिजे, अशी फटकेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी औरंगाबादमध्ये केली.
औरंगाबाद | आज भोंगे लावणारे आणि भोंग्यांसाठी बोलणारे उद्या घरात बसतील. पण संकट येतं तेव्हा जनताच अडचणीत सापडते. लोकांना पाऊस पाहिजे, अन्न, पाणी पाहिजे, अशी फटकेबाजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. आज जे भोंग्यांबद्दल बोलतायत, ते एकेकाळी आमच्या बाजूने बोलायचे. भाजपाविरोधात (BJP) पत्रकार परिषदा घ्यायचे, पण एकदा ईडीने बोलावं आणि त्यांचा ट्रॅकच बदलला झाला, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. औरंगपुरा येथए महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘दंगे, धोपे होतील, बोलणाऱ्याला चरोटाही येणार नाही’
सध्या भोंगे आणि दंग्यांचं जे राजकारण सुरु आहे, त्यावर छगन भुजबळ यांनी खरपूस टीका केली. भोंग्यांच्या अशा वक्तव्यामुळे दंगे, धोपे होतील. पण बोलणाऱ्याला चरोटाही येणार नाही. गोरगरीब जनता अडचणीत येणार आहे. माझी विनंती आहे, लोकांनी याकडे लक्ष देऊ नये… असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं..
इंपेरिकल डाटा उज्वला गॅस योजनेसाठी कसा चालतो?
केंद्र सरकारने राज्य सरकारांना इम्पेरिकल डाटा दिला नाही, असा आरोप करताना छगन भुजबळ म्हणाले, ‘इंपेरिकल डाटा केंद्र सरकार देत नाही म्हणून आज देशातील अनेक राज्य अडचणीत आले आहेत. प्रत्येकाने आपापली यंत्रणा कामाला लागली आहे. तोच डाटा केंद्राने महाराष्ट्रासह सर्वांना दिला असता तर सुप्रीम कोर्टात तोच सादर करता आला असता. हा देशातील सर्वच ओबीसींनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे. ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डाटा देत नाहीत कारण तो दुरुस्त नाही सांगितला जातो, मात्र तोच डाटा उज्वला गॅस योजनेसाठी तिकडे हा डाटा कसा काय चालतो? ओबीसींचा डाटा गोळा केला नाही मग 2011 ते 2016 तुम्ही काय केलं?
‘ईडीचा पहिला बळी मी’
केंद्र सरकारने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे ईडीच्या कारवाईचा धोशा लावलाय, असा आरोप करताना छगन भुजबळ म्हणाले, ईडीनं पहिला बळी माझा घेतला. कारण मी सर्वात जास्त बोलतो. संकट कुणावर येत नाही. सगळ्यांवरच येतात, पण त्यातूनही मी सावरलो, हे सांगताना छगन भुजबळ यांनी एक शेर सादर केला… रोज रोज गिरकर भी मुकमल खडा हूं, ए मुष्कीलों देखों मैं कितना बडा हु…
इतर बातम्या-