औरंगाबादः शहरात आठ दिवसांच्या खंडाने पाणीपुरवठा (Water Supply) होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांचा कालपासून सुरु केलेलं आंदोलन (Protest) अजूनही सुरुच आहे. सिडको एन-7 जलकुंभावर नागरिकांनी हे मुक्कामी आंदोलन सुरु केलं आहे. रात्रभर नागरिक आंदोलनाच्या (Aurangabad agitation) ठिकाणी बसून होते. रात्रभर भजन करत नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडला. सकाळीदेखील आमच्या हक्काचं पाणी द्या, अशा घोषणा नागरिक देत आहेत. मागील एप्रिल महिन्यातदेखील नागरिकांनी अशाच प्रकारचं आंदोलन केलं होतं. त्यावेळी मनपा प्रशासकांनी एक महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन हवेतच विरल्यानं भाजपाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पुन्हा एकदा मुक्कामी आंदोलन सुरु केलं आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाहीत, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी महिनाभरापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप पाणीपुरवठ्यात काहीही सुधारणा झालेली दिसून आली नाही. त्यामुळे शुक्रवारी भाजप-मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एन-7 जलकुंभावर मुक्कामी आंदोलन सुरु केलं. त्यापूर्वी हाडको येथील पवन नगरात सात दिवसांपासूसन पाणी न आल्याने एका शिवसैनिकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतलं. मात्र एन-7 जलकुंभावरील नागरिकांचं आंदोलन सुरुच आहे.
भाजपा आणि मनसेच्या पुढाकारातून सुरु झालेल्या या आंदोलनातही श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं चित्र आहे. काल ज्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला, ते ललित सरदेशपांडे हे शिवसैनिक असून दीड वर्षांपूर्वीच ते मनसेतून शिवसेनेत आले आहेत. या वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असल्याची चर्चा आहे. सरदेशपांडेंची भेट घेण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडेले पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी स्मार्ट सिटी व्यवस्थापनालाच धारेवर धरले. मात्र 2005 पासून औरंगाबादला मुबलक पाणी मिळवून देतो, असं आश्वासन त्यांनीही दिलं होतं हे ते विसरले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पाणीपुरवठा विभागप्रमुखांची बदली करतो, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. तर भाजपाच्या नेतृत्वात आंदोलकांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. मर्सिडीज बेबी काय म्हणतो, पाणी द्यायचं नाही म्हणतो… बारामतीचा पोपट काय म्हणतो, पाणी द्यायचं नाही म्हणतो.. अशा घोषणांनी आंदोलनाचा परिसर दणाणून गेला आहे.