Aurangabad | औरंगाबादेत हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार, दुर्लक्ष करणाऱ्यांना सक्ती, काय आहे नवा नियम?
हेल्मेट न वापरल्यामुळे किरकोळ अपघातातही डोक्याला मार लागल्यास गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कार करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
औरंगाबादः औरंगाबाद शहरातील वाहतूक पोलिसांनी (Traffic police) हेल्मेट सक्तीचे धोरण अधिक कठोरतेने अंमलात आणायचे ठरवले आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारीही सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये (Government offices) हेल्मेट न घालता येणारे कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना प्रवेश मिळणार नाही, असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. तर याउलट हेल्मेटचे महत्त्व जाणून दुचाकीवर (Two Wheelaers) सदैव हेल्मेट घालून फिरणाऱ्या नागरिकांचा वाहतूक पोलिसांतर्फे सत्कारही केला जाणार आहे. याद्वारे एक साकात्मक संदेश प्रशासनातर्फे समाजात दिला जाईल. त्यामुळे हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार आणि न घालणाऱ्यांना सक्ती असे दोन प्रकार शहरात येत्या काही दिवसात पहायला मिळतील.
हेल्मेट सक्तीसाठी काय आदेश?
राज्य परिवहन मंडळ आणि पोलिसांनी हेल्मेटविषयी जनजागृती करावी, त्यानंतर कारवाई करावी असे असे आदेश देण्यात आले आहेत. हेल्मेट सक्तीसाठी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी 22 मार्च रोजी हे आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये, हेल्मेट नसल्यास कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनातर्फेही हेल्मेटचा वापर वाढण्यासाठी प्रबोधन सुरु करावे, असे सांगण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाह सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.
शहर पोलिसांकडून हेल्मेटधारकांचा सत्कार
दरम्यान, शहरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर जशी दंडात्मक कारवाई होणार आहे, त्याचप्रमाणे हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार करण्याची योजनाही शहर पोलिसांनी हाती घेतली आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे किरकोळ अपघातातही डोक्याला मार लागल्यास गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कार करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. दर आठवड्याला सोडत काढून दहा जणांचा सत्कार यात करण्यात येणार आहे. हेल्मेटचे महत्त्व अनेकदा पटवून सांगितल्यानंतरही शहरातील अनेक चालक हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच काही दुचाकीस्वार न सांगताही स्वसुरक्षेसाठी जबाबदारीने हेल्मेटचा वापर करतात. अशा शिस्तप्रिय दुचाकीस्वारांचा सन्मान करून त्यांच्यासह इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम शहर पोलिसांतर्फे केले जाणार आहे.
इतर बातम्या-