औरंगाबादच्या प्रशासकांवर काँग्रेस नेते भडकले, तत्काळ बदली करण्याची मागणी, काय घडलं?
राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यालाच महापालिका प्रशासक अशा प्रकारची वागणूक देत असतील तर सामान्य जनतेला काय दाद देत असतील, असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केला आहे.
औरंगाबादः औरंगाबाद महापालिका आयुक्तांना (Aurangabad commissioner ) शहरातील समस्या सोडवायला वेळ नाही, त्यांचे काम अत्यंत मनमानी पद्धतीने सुरु आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी (Hisham Osmani) यांनी केला आहे. तसेच अशा प्रशासकांची तत्काळ बदलीही करण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील समस्यांसंबंधीचे निवेदन घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंगळ मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांना भेटण्यासाठी गेले. मात्र प्रशासकांच्या दालनाबाहेर त्यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले. अखेर संतापलेले काँग्रेसचे पदाधिकारी महापालिका प्रशासकांची भेट न घेताच परतले. तसेच बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत याविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
का भडकले काँग्रेसचे शहराध्यक्ष?
रमजान महिना तोंडावर आला आहे. त्याआधी शहरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचा प्रश्न घेऊन काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी हे काँग्रेसच्या पदाधितकाऱ्यांसह मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महापालिकेत पोहोचले. तेव्हा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय हे त्यांच्या दालनात होते. पालिकेत येण्याआधी उस्मानी यांनी प्रशासकांची वेळ घेतलेली होती. मात्र साडेतीन वाजेपर्यंत दालनाबाहेर प्रतीक्षा करूनही पांडेय यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आत बोलावले नाही. त्यामुळे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी भेट न घेताच माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
Today, a delegation led by Mr. Hisham Osmani Sahab, President of #Aurangabad City District #Congress Committee, submitted a memorandum to the Administrator – Astik K. Pandey about the civic problems in the city. Hameed Sayyed Sahab, Kiran Patil Sahab & others were also present. pic.twitter.com/1vTM6ipHQU
— INC Aurangabad City (@INCAbadCity) March 15, 2022
महापालिका प्रशासक काय म्हणतात?
शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून अंतर्गत रस्ते विकास, गुंठेवारी, कचरा, आरोग्यसह विविध कामांसाठी मनपा कार्यालयात नागरिक खेटे मारतात. प्रशासकांची भेट घेण्यासाठी नागरिकांना 15 ते 30 दिवसांची वाट पहावी लागते, असे आरोप नेहमीच केले जातात. मात्र महापालिका प्रशासकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मंगळवारी तब्बल 100 नागरिकांची भेट घेतल्याचा दावा पालिका प्रशाकांनी टीव्ही9 शी बोलताना केला.
प्रशासकांना हटवा- काँग्रेस शहराध्यक्ष
दरम्यान, एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यालाच महापालिका प्रशासक अशा प्रकारची वागणूक देत असेल तर सामान्य जनतेला काय दाद देत असतील, असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रशासकांची तत्काळ बदली करून नवीन प्रशासक नियुक्त करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
इतर बातम्या-