औरंगाबादः कोरोना बाधित नसताना केवळ हेल्थ विमा पॉलिसीचे पैसे उकळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार घेतल्याचे दर्शवण्यात आले. औरंगाबाद महापालिकेच्या चिकलठाणा मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला असून रुग्णाला येथून बनावट डिश्चार्ज कार्डदेखील मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे बोगस कार्ड (Bogus discharge card) तयार करून कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स (Insurance) कंपनीकडून 9 जणांनी विमा कंपनकडून 4 लाख 60 हजार रुपये उकळले. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. MIDC सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादेत लस न घेताच बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रीय झाली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता कोरोनाचे उपचार न घेताच बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कोटक जनरल इन्शुरन्समध्ये जहीर खान अजगर खान हे मुख्य व्यवस्थापक आहेत. कंपनीतील विम्यासाठी दाखल झालेल्या दाव्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 7 जून 2021- 12 जानेवारी 2022 दरम्यान 11 दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बुलेट हेल्थ केअर सर्व्हिसचे अधिकार केदारेश्वर अनिलराव सपकाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी तपासणी करताना मनपा हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर, चिकलठाणा येथे भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी आशिष बोरगे यांनी इंदल राजपूत, प्रवीण पवार, इम्रान शेख आणि गणेश कडू यांचे डिश्चार्ज कार्ड बनावट असल्याचे लिहून दिले. त्यांनी उपचार घेतलेले नाहीत, असेही स्पष्ट केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सदर प्रकरणी, MIDC सिडको पोलीस स्टेशनमध्ये 9 बनावट रुग्णांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात असित वाघ, अमोल रानसिंग, शिवाजी मुळे, शुभांगी राजपूत, किशनलाल गुर्जर, गणेश कडू, इंदल राजपूत, इम्रान मुश्ताक, प्रवीण पवार या आरोपींचा समावेश आहे. विमा कंपनीचे व्यवस्थापक जहीर खान यांनी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, 9 पैकी पाच जणांनीच प्रत्येकी 54 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत पॉलिसीची रक्कम उकळली आहे. हा आकडा चार लाख 62 हजार रुपये होतो. उर्वरीत चौघांनी साठ हजार रुपयांचा दावा दाखल केला होता. मात्र अद्याप त्याची रक्कम उचललेली नाही.
बनावट डिश्चार्ज कार्डवर पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हे डिश्चार्ज कार्ड मेल्ट्रॉन सेंटरचेच आहे. त्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी या घोटाळ्यात सहभागी असू शकतात. त्यांचा शोध घेऊन कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कोटक वगळता इतर विमा कंपन्यांमधून पैसे उकळण्यासाठीही असे बनावट डिश्चार्ज कार्ड करण्याची शक्यता असू शकते. त्याचा तपास कोण करणार, असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.
इतर बातम्या-