औरंगाबादः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस दिल्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत भाजप (Aurangabad BJP) नेत्यांनी आंदोलन केले होते. मात्र हे आंदोलन करताना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवत औरंगाबादच्या भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे आमदार अतुल सावे (MLA Atul Save), भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. क्रांती चौकात रविवारी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांवर दबाव टाकत ठाकरे सरकारचा हा तुघलकी कारभार सुरु आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी त्यावेळी केली होती. मात्र हे आंदोलन भाजप नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील क्रांती चौकात भाजप आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं होतं. यावेळी ‘ लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी तसेच आमच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठावला तर आम्ही तुम्हाला पोलिस व सरकारी वकीलांमार्फत षडयंत्रात अडकवून तुमचा आवाज दाबून टाकू असं तुघलकी कारस्थान महाबिघाडी सरकार करीत आहे, ‘ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी यावेळी दिली होती. ठाकरे सरकार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन उघडे केल्यामुळे पोलीसांमार्फत कचाट्यात अडकून त्यांना बेकायदेशीर नोटीस दिली आहे. या कारस्थानी सरकार विरोधात औरंगाबाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे ,प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, यांच्या नेतृत्वात संभाजीनगर येथील क्रांतीचौक या ठिकाणी नोटिशीची होळी करून नोटीस जाळण्यात आली होती.
दरम्यान, क्रांती चौकात रविवारी झालेल्या या आंदोलन प्रकरणी औरंगाबादेतील भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रांती चौकात गर्दी जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. आरोप झालेल्यांमध्ये भाजप आमदार अतुल सावे आणि भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांचाही समावेश आहे. एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने औरंगाबादमधील राजकीय वातावरणही तापण्याची चिन्ह आहेत.
इतर बातम्या-