औरंगाबादमध्ये चाललेय काय ? दीड लाख रुपयांसाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रोखला, तीन दिवसांतील दुसरी घटना
शहरातील नंदुलाल धुत रुग्णालयात दीड लाख रुपयांसाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह तब्बल आठ तास रोखल्याची घटना घडली आहे. ( aurangabad dhoot hospital corona patient dead body)
औरंगाबाद : संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामान करत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी रुग्णालय प्रशासनाच्या हेकेखोरपणाचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये सव्वा लाख रुपयांच्या बिलासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह आडवल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला होता. अगदी तसाच दुसरा प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे. शहरातील नंदुलाल धुत रुग्णालयात (Aurangabad Dhoot hospital) दीड लाख रुपयांसाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह तब्बल आठ तास रोखल्याची घटना घडली आहे. मात्र यावेळी औरंगाबाद येथील मनसेच्या नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर कोरोनाग्रस्ताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी (26 मे) हा प्रकार घडला. (Aurangabad Dhoot hospital refuses to hand over Corona patient dead body for One and Half Lakh rupees bill)
नेमकं काय घडलं ?
औरंगाबाद शहरातील नंदलाल धुत रुग्णालयात दीड लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह तब्बल आठ तास रोखून धरल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रशासनाला याबाबत जाब विचारला. तसेच रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा आग्रह केला. यावेळी आग्रह करुनही न ऐकल्यामुळे मृतदेह जर दिला नाही तर रुग्णालय फोडून टाकण्याची धमकी दिल्यानंतर रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राजीव जावळीकर आणि मंगेश साळवे या दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
बजाजनगरमध्ये सव्वा लाखांसाठी मृतदेह रोखला
औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्तांचा मृतदेह रोखण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी शहरातील बजाजनगर परिसरातील ममता हॉस्पिटमध्ये सव्वा लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखला होता. या रुग्णालयात अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु होते. यापैकीच एका कोरोनाग्रस्ताचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ममता हॉस्पिटरमध्ये गेले असता, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृतदेह देण्यात नकार दिला होता
त्या ऐवजी सव्वा लाख रुपयांच्या बिलाची नातेवाईकांकडे मागणी केली होती. नातेवाईकांनी बील न दिल्यामुळे रुग्णालयाने कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रोखून धरला होता. नंतर हा प्रकार समोर आल्यानंतर अवघ्या 18 तासांमध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या रुग्णालयाच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द केली होती. 26 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, सध्याचा कोरोना आणि लॉकडाऊनसदृश परिस्थिती यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. असे असले तरी कोरोनाग्रस्तांचे मृतदेह ताब्यात देण्याऐवजी राहिलेल्या बिलासाठी तगादा लावला जातोय. या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
इतर बातम्या :
70 टक्के बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणीही घटतीय, औरंगाबादकरांनी महिनाभरात ‘करुन दाखवलं!’
लॉकडाऊनमुळे स्वप्नांचा चक्काचूर, शेतकऱ्याचे 200 टन पेरु खराब, 8 ते 10 लाखांचं नुकसान!
औरंगाबादेत ‘त्या’ रुग्णालयाकडे परवानगी नसताना कोरोनाग्रस्तांवर उपचार, रुग्ण न्याय हक्क परिषदेचा आरोप
(Aurangabad Dhoot hospital refuses to hand over Corona patient dead body for One and Half Lakh rupees bill)