मोठी बातमी | आता वेरुळ, अजिंठ्यासह प्रमुख पर्यटन स्थळं सुरु, औरंगाबादची नवी नियमावली काय?
आता वेरुळ, अजिंठा लेणी, गौताळा अभयारण्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली राहतील. ऐन हिवाळ्यात पर्यटन स्थळे बंद राहिल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. आता मात्र हे नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकते.
औरंगाबादः कोव्हिडची तिसरी लाट नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे 9 जानेवारी रोजी औंरंगाबादमधील अजिंठा, वेरुळ लेण्यांसारख्या (Ellora Ajanta Caves) प्रमुख पर्यटन स्थळांसह सर्वच ठिकाणं बंद करण्यात आली होती. मात्र आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे तसेच जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona Vaccination) पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नवी नियमावली लागू होईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी (Aurangabad district collector ) काढले. त्यामुळे आता वेरुळ, अजिंठा लेणी, गौताळा अभयारण्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली राहतील. ऐन हिवाळ्यात पर्यटन स्थळे बंद राहिल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. आता मात्र हे नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकते.
जिल्ह्यासाठीची नवी नियमावली काय?
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशावरून जारी करण्यात आलेली नवी नियमावली खालील प्रमाणे-
- सर्व उद्याने आणि जंगल सफारी नियमित वेळेनुसार खुली लाहतील.
- ऑनलाइन तिकिटाद्वारे सर्व पर्यटकांना ही स्थळे पाहता येतील.
- सदर पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या संख्येबाबत संबंधित विभागाचे नियंत्रक प्राधिकारी निर्णय घेतील.
- पूर्णपणे लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच पर्यटन स्थळांवर प्रवेश मिळेल.
- जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे आधीच्याच नियमित वेळेत सुरु राहतील. वेळेवर कोणतेही निर्बंध नाहीत.
- स्पा, ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटींग सलून हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
- सर्व आस्थापनांनी कोव्हिड-19 प्रतिबंधक नियमावलीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
- अंत्ययात्रेला उपस्थिती राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल.
- लग्न सोहळ्यासाठी 200 वऱ्हाडी उपस्थित राहू शकतील.
- सर्वच सार्वजनिक ठिकाणी माल्स वापरणे, दो गज की दूरी, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
- स्विमिंग, वॉटर पार्क, खेळाच्या मैदानावर प्रेक्षक जाऊ शकतील.
- उपचारापूर्वी रुग्णालयात रुग्णांना लसीकरणाविषयी चौकशी करण्यात यावी.
- उपचारापूर्वी कोरोना चाचणी जशी बंधनकारक आहे, तसेच लसीकरणाची विचारणाही केली जावी.
- जिल्ह्यात आपापल्या कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या तसेच लसीकरणाचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती काय?
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 474 नवे रुग्ण आढळून आले. यात शहरात 332 तर ग्रामीण भागातील 142 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात शहरातील 715, ग्रामीण भागातील 158 अशा 873 जणांना डिश्चार्ज देण्यात आला.
इतर बातम्या-