Aurangabad | वेरूळ लेणीतल्या जैन स्तंभाचा वाद पुन्हा पेटणार, जागा बदलण्याच्या हालचाली, पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पुरातत्त्व विभागाने फेब्रुवारी महिन्यात हा स्तंभ मूळ जागेवरून बाजूला सरकवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र या स्तंभामुळे काहीही अडचण होत नसून त्याला धक्का न लावता त्याचे सौंदर्यीकरण करावे, असी भूमिका पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलचे अध्यक्ष वर्धमान पांड यांनी मांडली होती.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसमोर (Ellora Caves) 48 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला जैन कीर्तिस्तंभ (Jain Kirtistambh) हटवण्याचे प्रकरण पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच स्तंभाची जागा बदलण्यावरून फेब्रुवारी महिन्यात वाद निर्माण झाला होता. जैन धर्मीय आणि काही संघटनांनी स्तंभ हलवण्यास विरोध केला होता. अखेर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांनी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय मागे पडला. मात्र आता पुरातत्त्व विभागाच्या वतीने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना 22 जुलै रोजी पुन्हा एक पत्र देऊन हा स्तंभ हटवण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामुळे जैन समाजातून या निर्णयाला पुन्हा तीव्र विरोध होण्याची चिन्हे आहेत. भगवान महावीर यांच्या 2500 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त वेरूळ लेणीच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारासमोर हा स्तंभ उभारण्यात आला होता.
स्तंभाचा इतिहास काय ?
भगवान महावीर यांच्या 2500 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त 1974 मध्ये देशभरात जैन कीर्तिस्तंभ उभारण्यात आले होते. त्यासाठी केंद्र सरकारनेही त्यावेळी निधी दिला होता. औरंगाबादमध्ये वेरूळ, कन्नड आणि बाबा पेट्रोलपंप येथे स्तंभाला मंजुरी मिळाली होती. दरवर्षी भगवान महावीर जयंतीला येथे ध्वजारोहण, मिरवणूक आणि सद्भावना कार्यक्रम घेतले जातात. 48 वर्षानंतर हा स्तंभ बाजूला हटवण्याचा पुरातत्त्व विभागाने दिला. स्तंभामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, असे विभागाचे म्हणणे होते.
फेब्रुवारीत काय घडलं होतं?
पुरातत्त्व विभागाने फेब्रुवारी महिन्यात हा स्तंभ मूळ जागेवरून बाजूला सरकवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र या स्तंभामुळे काहीही अडचण होत नसून त्याला धक्का न लावता त्याचे सौंदर्यीकरण करावे, असी भूमिका पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलचे अध्यक्ष वर्धमान पांड यांनी मांडली होती. अनेक जैन संघटनांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर हा प्रश्न मांडला होता. वेरूळ लेण्या हिंदू, जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधित्व करत असताना हा स्तंभ केवळ जैन या एकाच धर्माचे प्रतिनिधीत्व करतो, यामुळे हा स्तंभ हटवण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पुरातत्व खात्याच्या अधीक्षकांनी त्यावेळी दिली होती. जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनाही निलेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून यावर निर्णय घेतो, असे म्हटले. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुरातत्त्व विभागाने हा स्तंभ हलवण्यावरून हालचाली सुरु केल्या आहेत.