औरंगाबादः औरंगाबाद शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील (Marathwada) सर्वच जिल्ह्यांतील रुग्णांसाठी महत्त्वाच्या अशा घाटी रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. रुग्णालयातील एका भागात दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयातील (GHATI Hospital) वसतीगृहात हे दृश्य दिसले आहे. गरीब आणि गरजू रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचा आधार म्हणून या रुग्णालयाकडे (Aurangabad hospital) पाहिलं जातं. तेथेच अधिकाऱ्यांच्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अभ्यागत समितीचे नवनियुक्त सदस्यांनी नुकतीच घाटी रुग्णालयातील संपूर्ण परिसरची पाहणी केली. त्यात वसतीगृहात हे चित्र दिसून आले. रुग्णालय पाहणीवर आलेल्या पथकासाठी हे अत्यंत संतापदायक होतं. त्यांनी तत्काळ रुग्णालयातील सदस्यांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयातील वसतीगृहात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला. काल बुधवारी रात्री अभ्यागत समितीचे नवनियुक्त सदस्य रुग्णालय पाहणीसाठी आले होते. रुग्णालयातील प्रत्येक विभागाला रात्रीच्या वेळी भेट देत त्यांनी बारकाईने पाहणी केली. मात्र वसतीगृहातील हे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. वसतीगृहात पडलेला बाटल्यांचा खच पाहून त्यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेतलं. रात्रीच रुग्णसेवा करणाऱ्यांची अचानक वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच या परिसरात दारुच्या बाटल्या आल्या कुठून, याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
धक्कादायक | Aurangabad मधील घाटी रुग्णालयात दारुच्या बाटल्यांचा खच, इथंच खरेदी-विक्रीही? pic.twitter.com/7eBxeF9tO0
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2022
घाटी रुग्णालय परिसरात या दारुच्या बाटल्या कुठून आल्या, यासंबंधी आता सविस्तर चौकशी केली जाईल. मात्र प्राथमिक चौकशीतून काही गोष्टी बाहेर आल्या आहेत. रुग्णालय परिसरातच दारुची खरेदी आणि विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकाराची यंत्रणांना खबरबात कशी नव्हती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराची माहिती असली तरीही त्याविरोधात आतापर्यंत कुणीच कसा आवाज उठवला नाही, यासाठी कुणाचं पाठबळ आहे, या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत, अशी मागणी रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईक मंडळींकडून केली जात आहे.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) ची स्थापना 15 ऑगस्ट 1965 रोजी झाली होती. तेव्हापासून युजी, पीजी, फेलोशिप, पीजी डीएमएलटी, बीपीएमटी, नर्सिंग, मॉडर्न फार्माकॉलॉजी आदी कोर्सेस येथे सुरु झाले आहेत. केवळ मराठवाड्यातूनच नव्हे तर बुलडाणा आणि विदर्भातील इतर रुग्णांसाठीदेखील हे रुग्णालय मोठा आधार आहे. मात्र रुग्णालय परिसरात असा अक्षम्य प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
इतर बातम्या-