ढगफुटी सदृश्य पावसाचं थैमान, सात गावांचा संपर्क तुटला, कुठे घडली घटना?
पिशोर परिसरातील भारंबा वाडी, कोळंबी तांडा-भारंबा, माळेगाव ठोकळ, जैतखेडा, माळेगाव लोखंडी, साळेगाव यासह इतर गावांचा संपर्क तुटला आहे.
औरंगाबादः राज्यभरात परतीच्या पावसानं (Rain) जोर धरलाय. औरंगाबादमध्ये (Aurangabad Rain) आज सकाळपासूनच संततधार पाऊस सुरु आहे. पण काही भागात वरुणराजानं उग्ररुप धारण केलंय. कन्नड तालुक्यातल्या (Kannad) पिशोर परिसरात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय. यामुळे पिशोरमधील अंजना पळशी प्रकल्प ओव्हर फ्लो झालाय. त्यामुळे या परिसरातील सात गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. अत्यंत आवश्यक कामासाठीही गावाबाहेर कसं पडायचं, असा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे.
7 गावांशी संपर्क तुटला
पिशोर परिसरातील भारंबा वाडी, कोळंबी तांडा-भारंबा, माळेगाव ठोकळ, जैतखेडा, माळेगाव लोखंडी, साळेगाव यासह इतर गावांचा संपर्क तुटला आहे. शेतातील जनावरांना चारा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेर पडावं लागत आहे. तसेच दुग्धव्यवसाय करणाऱ्यांनाही रोजच्या कामासाठी दोरी बांधून जीवघेणा पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
पिकं पिवळी पडली
पिशोर भागातील ढगफुटीसारख्या पावसामुळे नद्या आणि लहान नाले ओसंडून वाहत आहेत. शेतात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अति पाण्यामुळे पिकांवरही परिणाम झालाय. पिकं पिवळी पडत आहेत. रविवारच्या पावसामुळे पिकं वाचण्याची आशा कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. या पावसानं होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.