Aurangabad | हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मशिदींचे भोंगे तोडले पाहिजेत, करणी सेनाअध्यक्षांचे औरंगाबादेत वक्तव्य
महाराष्ट्र करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे महासंमेलन औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास 30 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या संमेलनानंतर सुरजपाल अम्मू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
औरंगाबाद | रात्री दहा वाजेनंतर भोंगे वाजवू नये, असा हायकोर्टाचा आदेश असताना जिथे जिथे भोंगे वाजतील, ते भोंगे तोडून टाकण्याचे आदेश करणी सेनेचे (Karani Sena) अध्यक्षांनी दिले आहेत. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मू (SurajPal Ammu) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad city) हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात करणी सेनेचे महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देविचंदसिंह बारवाल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार अंबादास दानवे, शिवचैतन्य महाराज, आमदार उदयसिंग राजपूत, करणी सेनेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा राखी गर्ग, प्रदेशच्या अॅड. संध्या राजपूत, बादलसिंग तवर, अमिता शेखावत, पंकजसिंह ठाकूर, बाबा ठाकूर, बाबा परदेशी, मधुकर ढोमसे, सुभाष राठौर, दिनेश राजपूत आदींची उपस्थिती होती.
काय म्हणाले करणी सेनेचे अध्यक्ष?
महाराष्ट्र करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे महासंमेलन औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास 30 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या संमेलनानंतर सुरजपाल अम्मू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ मी देशातील सर्व राज्यांमध्ये जात आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाण, चंदीगड, पंजाब, हिमाचल, राजस्थानातही जाणार आहे. परवा मी मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये होतो. आज महाराष्ट्रात आहे. ज्या प्रकारे हायकोर्टाचे आदेश आल्यानंतरही आजही मशीदीत लाऊडस्पीकरचा दुरुपयोग होत आहे. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मी आदेश दिले आहेत की जे हायकोर्टाचा आदेश पाळणार नाहीत, जिथे जिथे तुम्हाला वाटेल, ते कायद्याचे उल्लंघन करत आहेत, त्या माइकला तोडायला उशीर करू नका. कुणाला कायदेशीर कारवाई करायची असेल करु द्या. आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, असं वक्तव्य करणी सेनेच्या अध्यक्षांनी केलं.
लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचा उद्देश
हिंदू जनजागरण समितीचे एक उद्दिष्ट सांगताना सुरजपाल अम्मू म्हणाले, लोकसंख्या नियंत्रण कायदा बनणे हा आमचा उद्देश आहे. मोदी सरकारला आम्ही असा प्रस्ताव दिला आहे. हम दो हमारे दो… हा कायदा सर्वांसाठी झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ज्या प्रकारे एकाच धर्माची लोकसंख्या वाढत आहे, त्याला करणी सेनेचा विरोध आहे. कुणाला वाईट वाटले तरी वाटू द्या. या देशात एकच कायदा असावा. कॉमन सिव्हिल कोड लागू झाला पाहिजे. आर्थिक आधारावर आरक्षण लागू झाले पाहिजे, अशीही करणी सेनेची मागणी आहे.
इतर बातम्या-