Aurangabad | बाईकवर बिबट्याची झेप, पत्नीला वाचवण्यासाठी पतीचा आरडाओरडा! थरकाप उडवणारी घटना
वैजापूर तालुक्यातील या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाकडे याची तक्रार करूनही फार उपयोग होत नाही. कालच्या हल्ल्यानंतर येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
औरंगाबादः रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाताना अचानक बिबट्यानं हल्ला (Leopard Attack) केला. मागील सीटवर बसलेल्या पत्नीवर त्यानं झेप घेतली. हा भयंकर प्रसंग ओढवल्यानंतर पतीची बिबट्याशी झुंज सुरु झाली. डोळ्यादेखत तो पत्नीचे लचके तोडत होता. पण पतीनंही धीर एकवटला. या जनावराशी दोन हात करून त्याला परतवून लावायचं, असं ठरवलं. तो जीवाच्या आकांताने ओरडू लागला आणि बिबट्याचा प्रतिकारही (Aurangabad Leopard) करू लागला. या आवाजानं अखेरीस बाजूच्या गावातील नागरिक गोळा झाले आणि लोकांच्या आवाजामुळे बिबट्यानं तेथून पळ काढला. रविवारी रात्री आठच्या सुमारास औरंगाबादमधील वैजापूर (Vaijapur) तालुक्यात ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात पत्नीच्या हाताला जखम झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
कुठे घडला प्रकार?
स्थानिक पत्रकार प्रशांत त्रिभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, धावत्या दुचाकीवर अत्यंत हिंस्र प्राण्याचा हल्ला झाल्याच्या या घटनेची कल्पनाही करवत नाही. कापूसवाडगाव येथील रहिवासी परशूराम मुठ्ठे हे पत्नी सोबत दुचाकी वाहनावरुन बाहेरगावी गेले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास गावाकडे परतत असताना लाडगाव – कापूसवाडगाव रस्त्यावर ओढया जवळ दबा धरुन बसलेल्या हिंस्त्र बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. यात दोघेही खाली पडले होते.बिबट्याने महिलेच्या हाताचा लचका तोडून जखमी केला.पत्नीवर डोळयासमोर बिबट्याने हल्ला करीत असल्याचे पाहून परशुराम मुठ्ठे यांनी धीर धरुन बिबट्याचा प्रतिकार करुन जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले.लोकांचा जमाव आल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने महिला बचावली.
हाताला तीन ठिकाणी बिबट्याचा चावा
सदर घटनेतील जखमी महिलेला नागरिकांनी वैजापूर शहरातील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिच्या हाताला दोन ते तीन ठिकाणी बिबट्याने चावा घेतल्याचे डॉ. ईश्वर अग्रवाल यांनी सांगितले. डगावचे सत्यजीत सोमवंशी यांच्यासह नागरिकांनी जखमीना आधार हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.दरम्यान बिबट्याने महिलेवर हल्ला केल्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागावर स्थानिकांचा संताप
वैजापूर तालुक्यातील या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाकडे याची तक्रार करूनही फार उपयोग होत नाही. कालच्या हल्ल्यानंतर येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
इतर बातम्या-