Aurangabad | लोडशेडिंग तत्काळ मागे घ्या, अन्यथा… खासदार इम्तियाज जलील यांनी काय दिला इशारा?
लोडशेडींगमुळे सर्वसामान्य नागरीक अस्वस्थ आणि आक्रमक होत आहेत. परिस्थितीने उग्ररुप धारण करु नये अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद | लोडशेडिंगचा (Load Shedding) निर्णय तात्काळ मागे घ्या; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तांनीदेखील बैठक घेऊन महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांना परिस्थितीबाबत सतर्क करावे, असे आवाहन खासदार जलील यांनी केले आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु असून रामनवमी, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशा सणासुदीच्या काळात महावितरणने औरंगाबाद जिल्ह्यात अचानक लोडशेडिंग केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाने तात्काळ लोडशेडींगचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शंका खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे. काहीही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांची तत्काळ संयुक्त बैठक घेवून त्यांना परिस्थितीबद्दल सतर्क करण्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता व ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना पत्राव्दारे कळविले.
खासदार जलील यांचे महावितरणला पत्र
काही कारणासाठी सरकारने लोडशेडिंगचा निर्णय घेतला असेल तर तो लवकरात लवकर मागे घेतला जावा. तसेच जनतेला दिलासा द्यावा, अशा आशयाचे पत्र खासदार इम्तियाज जलील यांनी महावितरणचे सहसंचालक मंगेश गोंदावले व मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांना पाठवले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, सर्वांना माहितीच आहे जगभरातील मुस्लिमांसाठी रमजान हा पवित्र महिना असून ज्यामध्ये मुस्लिम बांधव दिवसा उपवास करुन प्रार्थना करीत असतात. हा एकमेव असा महिना आहे ज्यात सर्व प्रकारच्या व्यवसायांची भरभराट असते. दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व समाजातील नागरीकांनी आपआपला सण घरीच साजरा केला होता. मात्र आता सर्व प्रकारचे निर्बंध शिथिल झाले असून सर्व प्रकारचे आस्थापना व बाजारपेठा खुल्या आहेत. आता सर्व धर्मातील नागरीकांना आपआपले सण उत्साहात साजरे करायचे आहेत, त्यामुळे त्यात अडथळा आल्यास नागरिकांचा संताप अनावर होऊ शकतो.
नागरिक अस्वस्थ असून आक्रमक होऊ शकतात
रमजानच्या महिन्यातच महावितरणने लोडशेडिंग सुरु केले आहे. तसेच रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाण सुरु आहे. पुढे हनुमान जयंती, गुडफ्रायडे, महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अगदी जवळ आली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात दररोज तासन् तास वीज खंडित होत असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वाटत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. लोडशेडींगमुळे सर्वसामान्य नागरीक अस्वस्थ आणि आक्रमक होत आहेत. परिस्थितीने उग्ररुप धारण करु नये अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या-