औरंगाबाद | वाळूज ते शेंद्रा MIDC मार्ग, मेट्रो रेल्वेच्या DPR साठी महामेट्रोचे पथक शहरात दाखल
वाळूज ते शेंद्रा या मार्गावर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यासाठी महामेट्रोच्या चार अधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी बुधवारी शहरात दाखल झाले. हे पथक रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, हर्सूल, सिडको बसस्थानक भागात फिरले
औरंगाबादः मुंबई, पुणे शहरांप्रमाणे औरंगाबाद शहरातही मेट्रो (Metro in Aurangabad) रेल्वे सुरु करण्याची योजना शहरात काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी यासाठी पुढाकर घेतला असून हा विषय चांगलाच उचलून धरला आहे. त्यामुळे शहरातील शेंद्रा ते वाळूज या दोन MIDC च्या मार्गावर (Waluj to Shendra) मेट्रो रेल्वे सुरु करण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. या तीस किलोमीटर मार्गावर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव असून त्याचा DPR बनवण्यासाठी बुधवारी महामेट्रोचे पथक शहरात दाखल झाले आहे. या पथकातील चार अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पासंदर्भात प्राथमिक चर्चा केली.
पथकाने कुठे कुठे भेट दिली?
शहरातील वाळूज ते शेंद्रा या मार्गावर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यासाठी महामेट्रोच्या चार अधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी बुधवारी शहरात दाखल झाले. हे पथक रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, हर्सूल, सिडको बसस्थानक भागात फिरले. दुपानी महापालिका कार्यालयात जाऊन अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपसंचालक नगररचना ए.बी. देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. गुरुवारी शहराच्या विविध भागासह वाळूज आणि शेंद्रा MIDC ला हे अधिकारी भेट देत आहेत.
पालकमंत्र्यांचा प्रस्ताव, कराड यांचा पाठपुरावा
मुंबई, पुणे शरांप्रमाणेच औरंगाबादमध्येही मेट्रो रेल्वेची गरज असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच नमूद केले होते. नंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही मेट्रोचा विषय उचलून धरला. स्मार्ट सिटी, महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर स्मार्ट सिटीने वाळूज ते शेंद्रा या दोन MIDC दरम्यान मेट्रो सेवा सुरु करण्याचा डीपीआर बनवण्याचे काम महामेट्रोकडे सोपवले आहे.
इतर बातम्या-