औरंगाबादः आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय. एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. भाजपाला दूर ठेवणं आणि देशातून भाजप नष्ट करणं, या समान उद्दिष्टासाठी हा प्रस्ताव असल्याचं खासदारांनी सांगितलं. त्यामुळे औरंगाबादसह ज्या ज्या ठिकाणी एमआयएम मजबूत स्थितीत आहेत, त्या ठिकाणी महापालिकांची समीकरणं यंदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, एमआयएमवर वारंवार आरोप केला जातो की, आमच्यामुळे भाजपा जिंकून येते. उत्तर प्रदेशात आम्ही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांना ऑफर दिली होती. तुम्हालाही भाजपला हरवायचे आहे आणि आम्हाचेही उद्दिष्ट हेच आहे की, या देशातून भारतीय जनता पार्टीला नष्ट करायचे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच आरोप केले आहेत की, एमआयएममुळे भाजपाला मते मिळतात. त्यामुळे आता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक बैठक झाली. तेव्हा आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादसोबत जाण्यास तयार आहे. आम्ही ते काय करतात ते पाहू… असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं.
राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा मार्ग खुला करतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या दोन्ही पक्षांच्या धोरणांवर टीकाही केली. स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या या पक्षांनी शिवसेनेची साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात उभे राहण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला होता. त्यामुळे आता आम्हीही त्यांना प्रस्ताव दिलाय. भविष्यात यांनी आमच्यावर आरोप देण्यापूर्वी विचार केला पाहिजे की भाजपाला दूर राहण्यासाठी एमआयएम कुणासोबतही जाण्यास तयार आहे, असे खासदार म्हणाले.
इतर बातम्या-